पहलगाम हल्ला ते युद्धविराम – संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची कॉग्रेसची मागणी

0

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तरादाखल राबवलेले ऑपरेशन सिंदूर आणि आता युद्धविराम या कालावधीत विविध घडामोडी घडल्या. एकूणच भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राहुल गांधी यांनी पत्रात लिहिले की, संसदेचे विशेष अधिवेशन तात्काळ बोलावण्यात यावे, या विरोधकांच्या एकमताने केलेल्या आवाहनाचा मी पुनरुच्चार करतो. पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथम जाहीर केलेल्या युद्धविरामावर चर्चा करणे खूप महत्वाचे आहे. पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपला सामूहिक संकल्प प्रदर्शित करण्याची ही एक संधी असेल. मला खात्री आहे की, तुम्ही या मागणीचा गांभीर्याने विचार कराल आणि लवकरच त्यावर निर्णय घ्याल.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रात म्हटले की, तुम्हाला आठवत असेल की, 28 एप्रिल 2025 रोजी लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे आवाहन केले होते. आता ऑपरेशन सिंदूर आणि युद्धविरामची घोषणा झाल्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी एकमताने पुन्हा संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech