श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी (२२ एप्रिल रोजी) हिंदू पर्यटकांचे टार्गेट किलींग करणाऱ्या जिहादी दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे. आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी या जिहादी दहशतवाद्यांची नावे आहेत. या दहशतवाद्यांची छायाचित्रे आणि रेखाचित्रे (स्केच) आज, बुधवारी जारी करण्यात आली आहेत. याबाबत गुप्तचर विभागाकडून प्राप्त माहितीनुसार गेल्या एक महिन्यापासून ४ ते ५ दहशतवादी पहलगाम येथे सक्रीय होते. लश्कर-ए-तोयबाची शाखा असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटच्या (टीआरएफ) दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसरनमध्ये मंगळवारी (२२ एप्रिल रोजी) पर्यटकांवर गोळीबार केला होता. घटनेच्या दिवशी सुमारे ५ ते ६ दहशतवादी सभोवतालच्या घनदाट जंगलातून बैसरनमध्ये आले होते. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातून घुसखोरी करणाऱ्या जिहादी दहशतवाद्यांचा यात समावेश असल्याचे गुप्तचर विभागाने म्हंटले आहे.
या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ पर्यटकांपैकी युएई आणि नेपाळमधील नागरिकांचाही समावेश आहे. प्राथमिक फॉरेन्सिक अहवाल आणि हल्ल्याचे साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी सैन्याचा गणवेश घातला होता. तसेच दहशतवाद्यांनी संपूर्ण घटनाक्रम रेकॉर्ड करण्यासाठी बॉडी कॅम आणि हेल्मेट-माउंटेड कॅमेरे घातले होते. हल्लेखोर पूर्ण तयारीने आले होते आणि त्यांनी सुकामेवा आणि औषधे साठवली होती. सूत्रांनी सांगितले की दहशतवाद्यांनी स्थानिकांच्या मदतीने पहलगामची रेकी देखील केली. या दहशतवाद्यांपैकी २ जण पश्तो भाषेत बोलत होते तर आदिल आणि आसिफ नावाचे २ स्थानिक असून ते काश्मीरच्या बिजभेरा आणि त्राल येथील रहिवासी आहेत. गोपनिय सूत्रांच्या माहितीनुसार लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर सैफुल्लाह कसुरी उर्फ खालिद याच्यावर या हल्ल्याचा कट रचल्याचा संशय आहे.