नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक असल्याचे म्हटले होते. यावेळी हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की, पाकिस्तानी लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलेले नाही. तसेच, यापुढे भारतातील कोणत्याही लष्करी ठिकाणावर हल्ला केला गेला तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल, हेही पुन्हा अधोरेखित करण्यात आले.
या इशा-यानंतरही ७ – ८ मेच्या रात्री पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या ठिकाणी लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताकडून हे हल्ले ‘इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड’ व ‘एअर डिफेन्स सिस्टम’ने निष्फळ ठरवले. या हल्ल्यांचे पुरावे म्हणून विविध ठिकाणी आढळून आलेले अवशेष सध्या जमा करण्यात येत आहेत.
आज सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. भारताचे प्रत्युत्तर त्याच स्तरावर आणि त्याच तीव्रतेने होते. यासंदर्भात विश्वसनीय सूत्राकडून आलेल्या माहितीप्रमाणे, लाहोरमधील एक हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आली आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरून (एलओसी) विनाकारण गोळीबार वाढवला आहे. त्यांनी कमी क्षमता असलेली तोफ आणि त्याचबरोबर उच्च क्षमता असलेल्या तोफांचा वापर करून जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुला, उरी, पुंछ, मेंधार आणि राजौरी या भागांमध्ये गोळीबार केला.
या पाकिस्तानी गोळीबारामुळे तीन महिला आणि पाच लहान मुलांसह सोळा निरपराध नागरिकांचे प्राण गेले. सामान्य निष्पाप लोकांचा बळी जात असल्यामुळे या परिस्थितीत भारताला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले गेले आहे. भारताने दिलेल्या सडेतोड उत्तरामुळे पाकिस्तानकडून होणारा लहान तोफांचा आणि जास्त क्षमतेच्या तोफांचा गोळीबार थांबवण्यात आला. भारतीय सशस्त्र दलांनी पुन्हा एकदा आपली गैर-उत्तेजक भूमिकेची बांधिलकी अधोरेखित केली आहे. पाकिस्तानी लष्करानेही भारताने स्वीकारलेल्या भूमिकेचा सन्मान केला, तरच भारताला ही भूमिका कायम ठेवणे शक्य होणार आहे.