‘भारताबरोबर युद्ध करण्याची हिम्मत पाकिस्तानने दाखवू नये’- अमेरिका परराष्ट्र मंत्री

0

वॉशिंग्टन : पहलगाम हल्ल्याच्या बदला घेत भारताने पाकिस्तानावर एअर स्ट्राईक केला आहे.या एअर स्ट्राईकद्वारे भारताने पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.या कारवाईनंतर आता पाकिस्तानला अमेरिकेकडून भारताबरोबर युद्ध करण्याची हिम्मत दाखवू नये, असा इशारा मिळाला आहे.

अमेरिकी NSA आणि परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांना पाकिस्तानला समज दिली आहे. व्हाइट हाऊसमधील अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. ‘भारताने स्ट्राइक केलाय. पाकिस्तानने आता त्याला उत्तर देण्याचा विचारही करु नये. भारताबरोबर युद्ध करण्याची हिम्मत पाकिस्तानने दाखवू नये’ असं अमेरिकी परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे.

भारताबद्दल रुबियो असही म्हणाले की, ‘भारताला दहशतवाद्यांविरोधात कारवाईचा अधिकार होता. भारताने केलेल्या या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने कुठलाही हल्ल्याचा प्लान बनवू नये’

अमेरिकेने पाकिस्तानला समज दिली असली, तरी पाकिस्तानकडून प्रत्युत्तराची भाषा केली जात आहे. मार्को रुबियो यांनी पाकिस्तानी NSA शी चर्चा करुन शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. भारताच्या स्ट्राइकला उत्तर देण्याचा पाकिस्तानने विचारही करु नये, असं अमेरिकेने पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे.

मार्को रुबियो यांनी या हल्ल्यानंतर सोशल मीडिया हँडल एक्सवर पोस्ट करुन म्हटलय की, ‘मी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहे. ही तणावपूर्ण परिस्थिती लवकर निवळेल. शांततामय तोडगा काढण्यासाठी भारत आणि पाकिस्तान दोन्ही नेतृत्व मिळून काम करतील’

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी एअर स्ट्राइकनंतर लगेच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली. त्यांना ऑपरेशन दरम्यान केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तात्काळ टिप्पणी करत वेगाने तणाव कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘भारत आणि पाकिस्तानात दीर्घकाळापासून लढाई सुरु आहे. हे लवकर संपेल एवढीच मला अपेक्षा आहे’ असं ट्रम्प म्हणाले.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech