लाहोर : भारताने पाकिस्तानला मॉक ड्रीलमध्ये गुंतवून पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांवर जोरदार मिसाईल हल्ले चढविले आहेत. यामुळे पाकिस्तान घाबरला असून भारताला जशास तसे प्रत्यूत्तर देण्याची भाषा करू लागला आहे. भारताने बुधवारी (दि.७) पहाटे पाकिस्तानवर हवाई हल्ले केले आणि भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची पाकिस्तानी लष्कराने शपथ घेतल्याचे लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी म्हटले आहे.
भारताने बहावलपूरच्या अहमद पूर्व भागातील सुभानुल्लाह मशिदीवर, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे तीन ठिकाणी हवाई हल्ले केले, असे त्यांनी म्हटले आहे.आमची सर्व लढाऊ विमाने एअरबॉर्न आहेत. भारताने त्यांच्या हवाई हद्दीतून पाकिस्तानवर हा हल्ला केला आहे. आमची लढाऊ विमाने त्यांना कधीही पाकिस्तानी हद्दीत घुसू देणार नाहीत, असे चौधरी यांनी म्हटले आहे.भारताच्या या हवाई हल्ल्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, पाकिस्तान या हल्ल्यांना जोरदार प्रत्यूत्तर देईल. पाकिस्तान ठिकाण आणि वेळ निवडणार आहे, असे ते म्हणाले. भारताला मिळालेला हा तात्पुरता आनंद कायमस्वरूपी दुःखाने बदलला जाईल, अशीही धमकी त्यांनी दिली आहे.
पाकिस्तानकडून याचे प्रत्यूत्तर मिळण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय सैन्याने कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत-पाकिस्तान सीमेवर सर्व हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्या आहेत, असे सांगितले आहे. तसेच एअर इंडियाची विमानांचे उड्डाण दुपारी १२ वाजेपर्यंत रद्द करण्यात आले आहे. भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. ज्या भागातून भारतात दहशतवादी पाठविण्याचे काम पाकिस्तान करत होता त्या भागांवर मिसाईल डागण्यात आली आहेत. पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला आहे.