पाकिस्तानी नेतृत्वाला संयम राखण्याचा आणि इतिहासातून धडा घेण्याचा सल्ला – राजनाथ सिंह

0

पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर परिणाम भोगावे लागतील

कोलकाता : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला भूतकाळाची आठवण करून देत म्हटले की, ५५ वर्षांपूर्वी पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते, हे त्यांनी विसरू नये. त्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, यावेळी जर पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिले, तर त्याचे किती तुकडे होतील हे देवच जाणे. तसेच त्यांनी पाकिस्तानी नेतृत्वाला संयम राखण्याचा आणि इतिहासातून धडा घेण्याचा सल्ला दिला.

पश्चिम बंगालमधील बैरकपूर येथील निवडणूक सभेत बोलताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या धमकीबरोबरच तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानी धमकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत का आहेत, असा सवाल अभिषेक बॅनर्जी यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना राजनाथ सिंह म्हणाले की, देशाचे संरक्षणमंत्री म्हणून ते स्वतः या विषयावर बोलत आहेत आणि प्रत्येक मुद्द्यावर पंतप्रधानांनीच प्रतिक्रिया देणे आवश्यक नसते. भारताच्या सुरक्षा आणि संरक्षणविषयक धोरणाबाबत सरकारची भूमिका पूर्णपणे स्पष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले. संरक्षणाशी संबंधित विषयांवर बोलण्यासाठी ते पूर्णपणे अधिकृत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी अलीकडेच भारताविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. अहवालानुसार, भारताकडून कोणतीही कारवाई झाल्यास पाकिस्तान कोलकात्यावर हल्ला करून प्रत्युत्तर देईल, असे त्यांनी म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना राजनाथ सिंह यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी अशा प्रकारची भडकाऊ विधाने करू नयेत. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानला आपल्या चुकीची मोठी किंमत मोजावी लागली आणि बांग्लादेशच्या निर्मितीसह त्याचे दोन तुकडे झाले, याची त्यांनी आठवण करून दिली.

या संपूर्ण प्रकरणावरून पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरणही तापले आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी थेट कोलकात्याला लक्ष्य करण्याची धमकी दिली असताना केंद्र सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी अद्याप कठोर निषेध व्यक्त केला नसल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक प्रचारात व्यस्त असल्यामुळे बंगालच्या सुरक्षेकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचेही त्यांनी म्हटले.

एका जाहीर सभेत बोलताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, स्वतःला ‘५६ इंचाची छाती’ असल्याचे सांगणारे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह बाह्य धोक्यांबाबत शांत आहेत.बंगालमधील लोकांचे जीव त्यांच्यासाठी महत्त्वाचे नाहीत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारमध्ये धैर्य असेल तर सैन्य आणि सीमा सुरक्षा दलाला मोकळीक देऊन पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर परत मिळवावा, असे आव्हानही त्यांनी दिले. पाकिस्तानची धमकी ही भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला असल्याचे सांगत त्यांनी तातडीने कारवाईची मागणी केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech