भाजपात बृहद कुटुंबाचा विचार करणारे लोक – फडणवीस

0

मुंबई : राखीची जात, धर्म, प्रांत, भाषा काय आहे विचारायचं नाही. भाषा, जात, प्रांत प्रेमाचा आहे. त्याच्यात निरपेक्ष प्रेम आहे अशा प्रकारची राखी आहे. आम्ही परिवार, कुटुंबं मानणारी लोकं आहोत. भाजपात काम करत असताना आपण बृहद कुटुंबाचा विचार करणारे लोक आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या वतीने दादरच्या योगी सभागृहात राखी प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात मुख्यमंत्री फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती. राज्यातील महिलांनी पाठवलेल्या हजारो राख्या यावेळी मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महिला मोर्चा अध्यक्ष आमदार चित्रा वाघ, मंत्री आशिष शेलार यांसह प्रमुख पदाधिकारी, नेत आदी उपस्थित होते.

फडणवीस पुढे म्हणाले की, ज्ञानेश्वरांचा विचार सांगणारे आपण आहोत. ज्यांच्या पाठीमागे इतक्या बहिणींचं प्रेम, माया आहे त्यांचं कोण काय बिघडवणार. कोणत्याही शस्त्र, अस्त्रापेक्षा प्रेमाचे आशीर्वाद अधिक ताकदवान असतात. त्यामुळे आज सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा सेवा करण्यासाठी मुख्यमंत्रीपदाची जागा मला मिळाली. याच्या शिल्पकार लाडक्या बहिणी आहेत. अनेकजण निवडणूक संपल्यावर योजना बंद होतील असं म्हणत होतं. पण पाच वर्ष आपली एकही योजना बंद होऊ देणार नाही. पाच वर्षाने तुमच्या आशीर्वादाने सरकार आलं तर पुढचं पाच वर्षही असेल असंही त्यांनी म्हटलं आहे.

लखपती दीदीच्या कार्यक्रमात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत २५ लाख बहिणी लखपती दीदी झाल्या असून, २५ लाख होणार आहेत. एक कोटी बहिणींना लखपती दीदी केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लखपती दीदीचा कार्यक्रम जाहीर केला तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता. एकदा लाख रुपये किंवा तशी स्थिती झाली तर लखपती दीदी म्हणायचं का? तर असं नाही. जी महिला स्वत:च्या पायावर उभं राहून दरवर्षी वर्षाला एक लाखांपेक्षा जास्त कमवेल तिला लखपती दीदी म्हणता येईल. त्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरु केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाच्या विकासाचं जे स्वप्न पाहिलं, त्यात त्यांनी एकच गोष्ट सांगितली की विकासाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर लोकसंख्येचा ५० टक्के हिस्सा या स्वप्नाचा भाग होत नाही तोपर्यंत ते पूर्ण होणार नाही. महिला लक्ष्यित योजनांच्या माध्यमातून विकास मोदींनी सुरु केला. महिला केंद्रीत विकास हे मॉडेल या देशात मोदींनी सुरु केलं आणि बेटी बचाओ, बेटी पढाओचा जो प्रवास सुरु झाला तो लखपती दीदीपर्यंत पोहोचला आहे. आपल्या पायावर उभ्या राहिलेल्या बहिणी पाहायला मिळाल्या. आपल्याला किती अभिमान वाटता जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरु असताना पाकिस्तानाला धूळ चारतोय हे सागंणाऱ्या दोन भगिनी टीव्हीवर यायच्या. ज्याप्रकारे आपल्या सैन्याचा पराक्रम आणि भारताची दैदीप्यमान कामगिरी आमच्यापुढे मांडायच्या त्यावेळी हा नावा भारत आहे लक्षात यायचं. हा मोदींनी तयार केलेला भारत आहे.

आमची भगिनी घरात बसणारी नसून, देशाच्या विकासात सहभागी होणारी आहे. मोदींनी देशाच्या संसदेत, विधानसभेत भगिनींना भागीदारी दिली आहे. आपण आता कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी या थांबणार नाहीत. जर नारीशक्ती थांबली नाही तर देशाला कोणी थांबवू शकणार नाही. आता देश विकसित वाटचाल करत आहे. जगाच्या पाठीवर अमेरिका, युरोप, जपान, कोरिया ज्या देशांनी विकास केला तत्या देशाच्या लोकसंख्येतला ५० टक्के हिस्ला महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करुन देशाच्या मुख्यधारेत, अर्थव्यवस्थेत आणण्यात आलं. तसं केल्यास देशाच्या विकासाची गती दुपटीने वाढेल. यामुळे ते विकसित अर्थव्यवस्थेकडे गेले आणि मोठ्या प्रमाणात विकसित झाले. आता तीच भारताची वाटचाल सुरु झाली आहे. पुढच्या २० वर्षात भारत जगातील पहिली किंवा दुसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार. यात तुमची भागीदारी महत्त्वाची असणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech