मृतदेहांपैकी ७ जणांची ओळख पटवण्यात आले यश
अहमदाबाद : एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर आज, शुक्रवारी घटनास्थळाहून आतापर्यंत २७० जणांचे मृतदेह आढळून आलेत. यामध्ये विमानाचे प्रवासी आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांचा समावेश आहे. यापैकी ७ मृतदेहांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थीव नातेवाईकांना सोपवण्यात आले. परंतु, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.
अपघातग्रस्त विमानामध्ये २७० प्रवासी होते. त्यापैकी एक प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. यामुळे सुमारे २४१ प्रवासी आणि हॉस्टेलमधील डॉक्टर्स असे एकूण २७० मृतदेह आहेत. परंतू, विमानाच्या प्रवाशांच्या संख्येपेक्षा जास्त असलेले मृतदेह कोणाचे आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. अपघातावेळी हॉस्टेलच्या मेसमध्ये ५० हून अधिक लोक होते, असे सांगितले गेले आहे. जसेजसे मृतांचे नातेवाईक पोहोचले आहेत, तसे डीएनए टेस्ट केले जात आहेत. परदेशातील प्रवाशांचे देखील नातेवाईक अहमदाबादला पोहोचले आहेत. त्यांचेही डीएनए सॅम्पल घेतले जात आहेत. येत्या काही दिवसांत सर्व मृतदेहांची ओळख पटण्याची अपेक्षा आहे. यानंतर मृतांचा खरा अधिकृत आकडा जाहीर केला जाणार आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये २७० हून अधिक मृतदेहांचे पोस्टमार्टेम झाले आहे. यापैकी २७० मृतदेहांचे डीएनए सॅम्पल घेण्यात आले आहेत. ७ मृतदेहांची ओळख पटली आहे. विमान अपघात प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच विमान अपघात तपास ब्युरोसह (एएआयबी) ८ एजन्सींनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यामध्ये युकेची अपघात चौकशी शाखा (युके-एएआयबी), युनायटेड स्टेट्सचे राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (एनटीएसबी), फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) यांचा समावेश आहे.