नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दोन दिवसांच्या मलेशिया दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यात ते मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार ही पंतप्रधान मोदी यांची मलेशियाची तिसरी भेट असून, ऑगस्ट २०२४ मध्ये दोन्ही देशांमधील संबंध ‘व्यापक रणनीतिक भागीदारी’च्या स्तरावर नेल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे. दरम्यान मलेशिया दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वीच पंतप्रधानांनी निवेदनात म्हटले की, माझे मित्र पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या आमंत्रणावरून मी आज मलेशियाच्या अधिकृत भेटीला जात आहे. भारत आणि मलेशिया यांच्यातील ऐतिहासिक संबंधांमध्ये अलिकडच्या काळात सातत्यपूर्ण प्रगती झाली आहे.
पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशी होणाऱ्या चर्चेची आणि आमच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला आणखी दृढ करण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करणे, आर्थिक आणि नवोन्मेष भागीदारी वृद्धिंगत करणे तसेच सहकार्याचा विस्तार नव्या क्षेत्रांत करण्याचा आपला प्रयत्न असेल. मलेशियातील भारतीय समुदायाशी भेट घेण्यासही मी उत्सुक आहे. जवळपास तीन दशलक्ष इतकी संख्या असलेला हा समुदाय जगातील सर्वांत मोठ्या भारतीय प्रवासी समुदायांपैकी एक आहे. मलेशियाच्या प्रगतीत त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबरोबरच आपल्या दोन्ही देशांमधील भक्कम दुवा म्हणून त्यांनी निभावलेली भूमिका आपल्या ऐतिहासिक मैत्रीला भक्कम आधार प्रदान करते.
या दौऱ्यात संरक्षण क्षेत्रातील सहकार्याच्या संधींवर विशेष भर देण्यात येणार असून डॉर्नियर विमाने, स्कॉर्पीन पाणबुड्या आणि एसयू-३० विमानांच्या देखभालीसंबंधी चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी मलेशियातील भारतीय समुदायातील सदस्य तसेच विविध व्यावसायिक प्रतिनिधींशीही संवाद साधणार आहेत. मलेशियात सुमारे २९ लाख भारतीय वंशाचे नागरिक वास्तव्यास असून, हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा भारतीय समुदाय आणि दुसऱ्या क्रमांकाचा पीआयओ समुदाय आहे.
मलेशिया हा आसियान आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारतासाठी महत्त्वाचा भागीदार असून भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाचा तो एक प्रमुख आधारस्तंभ आहे. कुआलालंपूरच्या ब्रिकफील्ड्स येथे असलेले तोरण गेट हे दोन्ही देशांतील मैत्रीचे प्रतीक असून भारताने मलेशियाला दिलेले एक स्मारक आहे. या तोरण गेटचे उद्घाटन २३ नोव्हेंबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक यांच्या हस्ते झाले होते.
१९ ते २१ ऑगस्ट २०२४ दरम्यान अन्वर इब्राहिम यांच्या भारत दौऱ्यात भारत-मलेशिया राजनैतिक संबंधांना ‘व्यापक रणनीतिक भागीदारी’चा दर्जा देण्यात आला होता. त्याआधी २०१५ मध्ये हे संबंध ‘उन्नत रणनीतिक भागीदारी’च्या स्तरावर पोहोचले होते. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांची स्थापना १९५७ मध्ये झाली होती. पंतप्रधान मोदी यांनी ६ जुलै २०२५ रोजी ब्राझीलमधील रिओ डी जनेरियो येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेतही पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांची भेट घेतली होती. तसेच २६ ऑक्टोबर २०२५ रोजी कुआलालंपूर येथे झालेल्या २२ व्या आसियान-भारत शिखर परिषदेत त्यांनी व्हर्च्युअली सहभाग घेतला होता आणि २२ ऑक्टोबर २०२५ रोजी दोन्ही पंतप्रधानांमध्ये दूरध्वनीवरही चर्चा झाली होती.