लखनऊ : नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी(दि.३०) कानपूर भेटीदरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदी याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर शुभम द्विवेदीची पत्नी ऐशन्या द्विवेदीने प्रतिक्रिया दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही असं सांगितल्याचं ऐशन्याने म्हटलं आहे.
कानपूरचे खासदार रमेश अवस्थी यांनी एका आठवड्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून नरेंद्र मोदी यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदीच्या कुटुंबाला भेटण्याची विनंती केली होती. त्यानंतर मोदींनी आज(दि. ३०) शुभमच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “संपूर्ण देश आणि सरकार आमच्यासोबत आहे. पंतप्रधान खूप दुःखी होते, त्यांनी मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल विचारलं. दहशतवादाविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही असं मोदींनी सांगितलं. तसेच त्यांनी आम्हाला आणखी एका भेटीचं आश्वासन दिलं” असं ऐशन्या द्विवेदीने सांगितलं आहे.
पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर शुभम द्विवेदीचे वडील संजय द्विवेदी म्हणाले की, “पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून दहशतवादाविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आल्याबद्दल आम्ही आभार मानतो. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण देश पंतप्रधानांसोबत आहे. पंतप्रधान मोदींनी आम्हाला सांगितलं की दहशतवादाविरुद्धची लढाई सुरूच राहील.यावेळी पंतप्रधान मोदीही भावूक झाले.”