शरद पवारांच्या तब्येतीची पंतप्रधान मोदींकडून विचारपूस

0

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोमवारी बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. छातीत झालेल्या संसर्गामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः शरद पवार यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. याशिवाय केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही पवार यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत त्यांच्या आरोग्याबाबत चौकशी केली .

यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शरद पवार यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली होती. “बाबांना छातीत संसर्ग झाला आहे. डॉक्टरांनी त्यांना पाच दिवसांचा अँटीबायोटिक्स कोर्स घेण्याचा सल्ला दिला आहे. सुदैवाने त्यांचे इतर सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे काहीही कारण नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले होते. रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर अभिजित लोढा यांनीही शरद पवार यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असल्याचे सांगितले आहे. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे निरीक्षण सुरू असून, उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, शरद पवार यांना आज संध्याकाळी किंवा उद्या डिस्चार्ज देण्याची शक्यता आहे. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याने समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये दिलास्याचे वातावरण आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech