भारत-पाक दरम्यान तिसऱ्याची मध्यस्ती अमान्य
नवी दिल्ली : ‘जम्मू आणि काश्मीरशी संबंधित कोणताही मुद्दा केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवला जाईल. त्यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका राहणार नाही. पाकिस्तानला बेकायदेशीरपणे व्यापलेले काश्मीर (पीओके) रिकामे करावे लागेल. हे भारताचे बऱ्याच काळापासूनचे धोरण असून यात कुठलाही बदल नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल बजावले. परराष्ट्र मंत्रालयातर्फे आज, मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत जयस्वाल बोलत होते.
भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ यांच्यामध्ये १० मे रोजी झालेल्या चर्चेनंतर शस्त्रसंधीवर सहमती झाल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. तांत्रिक कारणांमुळे हॉटलाइनद्वारे भारताशी संपर्क साधता न आल्याने पाकिस्तानने त्याच दिवशी पहाटे १२:३७ वाजता या संभाषणाची विनंती केली. त्यानंतर भारतीय डीजीएमओ यांच्या उपलब्धतेनुसार दुपारी १५:३५ वाजता कॉल करण्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. भारताने स्पष्ट केले की, त्याच दिवशी सकाळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या प्रमुख हवाई तळांवर अत्यंत प्रभावी हल्ले केले. भारतीय लष्कराच्या ताकदीमुळेच पाकिस्तानला गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यास भाग पाडल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. ‘पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला तर भारतीय सैन्यही त्याला प्रत्युत्तर देईल. पण जर पाकिस्तान थांबला तर भारतही थांबेल. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करताना पाकिस्तानलाही हाच संदेश देण्यात आला होता, ज्याकडे त्यांनी त्यावेळी दुर्लक्ष केल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानकडून होणाऱ्या विजयाच्या दाव्यावर जयस्वाल यांनी सांगितले की, विजयाचा दावा करणे पाकिस्तानची जुनी सवय आहे. यापूर्वी १९६५, १९७१ आणि १९९९ च्या कारगिल युद्धात देखील असेच केले होते. त्यावेळी देखील पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानने विजयाचा खोटा ढोल वाजवला होता. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत सिंधू जल करार स्थगित ठेवला जाईल असे जयस्वाल यांनी ठणकावून सांगितले. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेसोबतच्या व्यापाराबाबत चर्चे संदर्भात जयस्वाल म्हणाले की, गेल्या ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून ते १० मे रोजी गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याच्या करारापर्यंत, भारत आणि अमेरिकेमध्ये तत्कालीन लष्करी परिस्थितीवर चर्चा झाली. यापैकी कोणत्याही चर्चेत व्यापाराचा मुद्दा नव्हता असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.