अयोध्या : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आगामी मार्च महिन्यात अयोध्येला जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु, श्रीराम मंदिर निर्माण समितीने राष्ट्रपतींना अयोध्येला येण्याचे आमंत्रण दिले आहे. राष्ट्रपती अयोध्या दौऱ्यावर नक्की येतील असे संकेत मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिले. यासंदर्भात नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांनी अलीकडेच राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना अयोध्येला येण्याचे औपचारिक निमंत्रण दिले होते. ट्रस्टच्या सदस्यांनी राष्ट्रपतींना अयोध्येत येऊन भगवान श्रीरामांचे दर्शन घेण्याचे आमंत्रण दिले आहे. त्या आपल्या वेळापत्रकानुसार, कदाचित मार्चमध्ये, एखादी तारीख निश्चित करतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. अद्याप औपचारिक माहिती मिळालेली नसली, तरी अनौपचारिक पातळीवर त्यांनी संमती दर्शविल्याचे कळते, असे मिश्रा यांनी सांगितले. यावेळी त्यांनी रामायणाशी संबंधित प्राचीन हस्तलिखितांबाबतही माहिती दिली.
नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाने ट्रस्टला सुमारे ४०० वर्षे जुनी दुर्मिळ हस्तलिखित प्रत भेट दिली आहे. या हस्तलिखितामध्ये वाल्मीकी रामायणाशी संबंधित मजकूर प्राचीन संस्कृत लिपीत लिहिलेला आहे. ही प्रत पूर्वी राष्ट्रपती भवन संग्रहालयासाठी देण्यात आली होती. मात्र, अयोध्या मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर रामायणाशी संबंधित साहित्याकरिता विशेष दालन उभारले जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर, विद्यापीठाने ट्रस्टच्या विनंतीवरून हे हस्तलिखित कायमस्वरूपी भेट देण्याचा निर्णय घेतला. मिश्रा यांनी सांगितले की, मंदिर परिसरात विविध भारतीय भाषांमधील प्राचीन रामायण ग्रंथ आणि वाल्मीकी काव्याचे अनुवाद जतन व संरक्षित करण्याची योजना ट्रस्ट राबवत आहे. यामुळे राम मंदिर धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.