पंतप्रधान मोदी ७–८ फेब्रुवारीला मलेशिया दौऱ्यावर

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस मलेशियाच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा ७ ते ८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणार आहे. या काळात पंतप्रधान मोदी मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे मलेशियाचे पंतप्रधान दातो सेरी अन्वर इब्राहिम यांची भेट घेणार आहेत. दौऱ्यादरम्यान ते मलेशियामध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाशी संवाद साधतील तसेच मलेशियन फोरममध्ये सहभागी होतील.पंतप्रधान मोदी यांचा हा मलेशियातील तिसरा अधिकृत दौरा असेल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. भारत आणि मलेशिया हे देश सभ्यतागत, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नात्यांनी जोडलेले असून दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, मलेशियामध्ये सुमारे २९ लाख भारतीय वंशाचे लोक वास्तव्यास आहेत. जगातील भारतीय वंशाच्या लोकसंख्येमध्ये हा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा समुदाय असून यामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ झाले आहेत.

या तिसऱ्या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांचे पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करतील. यासोबतच पंतप्रधान मोदी भारतीय समुदाय, तसेच उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील प्रतिनिधींशीही संवाद साधतील. या दौऱ्याच्याच काळात १०वा भारत–मलेशिया सीईओ फोरम आयोजित केला जाणार आहे. या दौऱ्यात व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा आणि सागरी सहकार्य, तसेच डिजिटल व आर्थिक तंत्रज्ञान, ऊर्जा, आरोग्य, शिक्षण, संस्कृती आणि पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यावर चर्चा होणार आहे. याशिवाय भविष्यातील संयुक्त उपक्रम आणि योजनांवरही सहमती होण्याची शक्यता आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्ट २०२४ मध्ये मलेशियाच्या दौऱ्यावर गेले होते. त्या वेळी दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक विस्तारून त्यांना समग्र धोरणात्मक भागीदारी (Comprehensive Strategic Partnership) या स्तरावर नेण्याबाबत चर्चा झाली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech