“भारत न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही”- पंतप्रधान

0

ऑपरेशन सिंदूर केवळ स्थगित, आगळीक केल्यास प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताला कुणीही अणुबॉम्बची भीती घालू नये. आम्ही अणवस्त्र हल्ल्याच्या धमकीला भीक घालत नाही. त्यामुळे भारत “न्यूक्लिअर ब्लॅकमेल” सहन करणार नसल्याचा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, सोमवारी दिला. भारत पाकिस्‍तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी आज सायंकाळी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्‍यांनी ऑपरेशन सिंदूर व युद्धाबाबत देशाची भूमिका स्‍पष्‍ट करताना ते बोलत होते. भारत कदापीही दहशतवाद सहन करणार नाही. दहशतवाद पोसणारे सरकार व दहशतवादी म्‍होरके यांना वेगवेगळे समजणार नाही तर त्‍यांना एकाच तराजूत तोलेले जाईल. त्‍यांनी यातून पाकिस्‍तान सरकारवर थेट निशाणा साधला आहे व यापूढे होणाऱ्या दहशतवादी कारवायांना थेट पाकिस्‍तानलाच जबाबदार धरले जाईल असे अप्रत्‍यक्षपणे स्‍पष्‍ट केले आहे. याबरोबर मोदी यांनी आपल्‍या भाषणात सैन्यदलाचे आभार मानले आहेत. तसेच ऑपरेशन सिंदूर हे केवळ स्‍थगित कले आहे थांबवलेले नाही असेही त्‍यांनी सांगितले. टेरर आणि टॉक एकत्र चालणार नाही. पाणी आणि रक्ताचे पाटही एकत्र वाहणार नाही. सगळ्या जगाला उद्देशून मोदी म्हणाले की, जर पाकिस्तानशी चर्चा करायची असेल तर ती पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवादी कारवाया यांच्यावरच होईल.हे युग युद्धाचे नाही तसेच दहशतवादाचेही नाही.पाकिस्तान ज्या पद्धतीने दहशतवादाला पाठबळ देत आहे, एक दिवस पाकिस्तान स्वतःच संपून जाईल. आमच्या आई-बहिणींच्या माथ्यावरील सिंधूर मिटविण्याच्या प्रयत्नांचा परिणाम काय होतो हे आम्ही दाखवून दिले, सध्याची शस्त्रसंधी म्हणजे कारवाई तात्पुरती स्थगित केली आहे, असा इशारा मोदींनी दिला.

ऑपरेशन सिंदूरमुळे भारत पाकिस्तान संबंधात नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे भारतावरील हल्ल्याचा सडेतोड कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. अण्विक शक्तीच्या मागे कुणी लपू नये. भारत निर्णायक प्रहार करेल. आम्ही दहशतवाद्यांना सोडणार नाही. आपण सर्वांनी मागील काही दिवसांत देशाचे सामर्थ्य आणि संयम दोन्ही पाहिले आहे. मी सर्वप्रथम भारताच्या पराक्रमी सैन्याला, सशस्त्र दलांना, आपल्या गुप्तचर संस्थांना, आपल्या वैज्ञानिकांना प्रत्येक भारतीयाच्या वतीने सलाम करतो. आमच्या वीर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी असीम शौर्य दाखवले. मी त्यांच्या वीरता, साहस आणि पराक्रमाला देशातील प्रत्येक माता, बहिणींना समर्पित करतो.

गेल्या २२ एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जी क्रूरता दाखवली, या क्रूरतेने देश आणि जगाला हादरवून सोडले. सुट्ट्यांवर आलेल्या निरपराध नागरिकांना त्यांच्या धर्म विचारून, त्यांच्या कुटुंबीयांसमोर, त्यांच्या मुलांसमोर निर्दयपणे मारले गेले. हा दहशतवादाचा अत्यंत विद्रूप चेहरा होता. हा देशाचं सौहार्द तोडण्याचा घृणास्पद प्रयत्न होता. माझ्यासाठी वैयक्तिकरित्या ही वेदना खूप मोठी होती. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक राजकीय पक्ष, एका स्वरात दहशतवादाविरुद्ध उभा राहिला आहे. आम्ही दहशतवाद्यांना पूर्णपणे नष्ट करण्यासाठी भारताच्या सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. आज प्रत्येक दहशतवादी, दहशतवाद्यांचा प्रत्येक संघटना यांना कळून चुकले आहे की आमच्या बहिणींच्या, मुलींच्या कपाळावरून सिंदूर पुसण्याचा परिणाम काय होतो.

ऑपरेशन सिंदूर ही न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. गेल्या ६ आणि ७ मे च्या रात्री संपूर्ण जगाने ही प्रतिज्ञा परिणामात बदलताना पाहिली. भारताच्या सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर, त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर अचूक हल्ले केले.दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की भारत असा मोठा निर्णय घेऊ शकतो. पण जेव्हा देश एकजूट होतो, राष्ट्र प्रथम या भावनेने देश परिपूर्ण असतो, तेव्हा फौलादी निर्णय घेतले जातात आणि परिणाम साध्य करून दाखवले जातात.भारताच्या दहशतवादा विरोधातील कारवाईमुळे पाकिस्तान निराशेत बुडाला होता. पाकिस्तान संतापला होता आणि या संतापातच त्याने आणखी एक दुस्साहस केले. दहशतवादावरील भारताच्या कारवाईला पाठिंबा देण्याऐवजी पाकिस्तानने भारतावरच हल्ला सुरू केला. भारताने पाकिस्तानच्या छातीवर वर केला. पाकिस्तानच्या एयरबेसला भारताने उध्वस्त केले. पाकिस्तानने दहशतवादाला विरोध करण्याऐवजी भारतावर हल्ला केला. घमेंडी पाकिस्तानला आम्ही नेस्तनाबूत केले.

भारतावर दहशतवादी हल्ला केला तर भारत त्याला जोरदार प्रत्युत्तर देणार. कोणतेही न्युक्लीयर ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही. दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. पाकिस्तानने आमच्या शाळा, महाविद्यालये, गुरुद्वारे, मंदिरे आणि सामान्य नागरिकांच्या घरांना लक्ष्य केले. त्यांनी आमच्या लष्करी तळांवर हल्ले केले. यात पाकिस्तान स्वतःच उघडा पडला. जगाने पाहिले की पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाइल्स भारतासमोर विखुरली गेली. भारताच्या सशक्त हवाई संरक्षण यंत्रणेने त्यांना आकाशातच नष्ट केले. पाकिस्तानची तयारी सीमेवर हल्ला करण्याची होती, पण भारताने पाकिस्तानच्या छाताडावर हल्ला केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech