गुरुग्राममध्ये ऑगस्ट २०२६ पासून कॅम्पस सुरू होणार
नवी दिल्ली : यूकेमधील ४५० हून अधिक वर्षांच्या शैक्षणिक परंपरेवर आधारित क्वीन एलिझाबेथ स्कूल, बार्नेट यांनी GEDU ग्लोबल एज्युकेशन यांच्या भागीदारीत भारतातील आपली पहिली शाखा गुरुग्राम येथे सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा कॅम्पस ऑगस्ट २०२६ मध्ये सुरू होणार असून, भारतीय विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे K१२ शिक्षण उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. सन १५७३ मध्ये क्वीन एलिझाबेथ यांच्या रॉयल चार्टरद्वारे स्थापन झालेली ही शाळा शैक्षणिक उत्कृष्टता, चारित्र्यनिर्मिती आणि नेतृत्व विकासासाठी जागतिक स्तरावर ओळखली जाते. गुरुग्राममधील कॅम्पसही या परंपरा, मूल्ये आणि उच्च शैक्षणिक मानदंड कायम ठेवणार आहे. येथे सखोल अभ्यास, बौद्धिक शिस्त आणि सर्वांगीण विकासावर आधारित अभ्यासक्रम राबवला जाणार असून विद्यार्थ्यांना जागतिक नेतृत्वासाठी तयार केले जाईल.नव्या कॅम्पसमध्ये जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा, जलतरण तलाव तसेच सर्जनशील आणि सादरीकरण कलांसाठी विशेष सोयी उपलब्ध असतील. स्थानिक संदर्भ आणि मूळ शाळेच्या परंपरेचे संतुलन साधणारे शिक्षण वातावरण येथे निर्माण केले जाणार आहे.
या घोषणेवेळी क्वीन एलिझाबेथ्स ग्लोबल स्कूल्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरोलिन पेंडल्टन-नॅश म्हणाल्या की, गुरुग्राममध्ये शाळेचे उद्घाटन हा संस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. आज भारतात जन्मलेली मुले २०४७ मध्ये पदवीधर होतील आणि विकसित भारताच्या कार्यशक्तीचा भाग बनतील. अशा पिढीसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण आवश्यक असून, भारतीय कुटुंबांपर्यंत QE ची परंपरा, मूल्ये आणि उच्च दर्जाचे शिक्षण पोहोचविण्याचा आम्हाला अभिमान आहे.GEDU ग्लोबल एज्युकेशनने २०२७-२८ मध्ये दुसऱ्या क्वीन एलिझाबेथ स्कूल कॅम्पसचे नियोजन करत पुढील तीन वर्षांत भारतातील K12 आणि उच्च शिक्षण क्षेत्रात £150 ते £200 दशलक्ष पाऊंड गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. भारतात दर्जेदार शिक्षणसंस्थांचे जाळे उभारण्याचा GEDU चा दीर्घकालीन दृष्टिकोन यामागे असल्याचे सांगण्यात आले.
क्वीन एलिझाबेथ स्कूल, बार्नेटचे मुख्याध्यापक नील एनराइट यांनी भारतातील विद्यार्थ्यांना सर्वांगीण आणि समृद्ध QE शिक्षण देण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. उच्च आकांक्षा, समर्पण आणि समुदायाच्या सक्रिय सहभागावर आधारित QE ची मूल्ये गुरुग्राममध्येही प्रतिबिंबित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या शाळेला नुकतेच ‘द संडे टाइम्स स्टेट सेकंडरी स्कूल ऑफ द इयर’ तसेच A-levels साठी ‘स्टेट स्कूल ऑफ द इयर’ म्हणून गौरवण्यात आले आहे. GCSE आणि A-level निकालांमध्ये ही शाळा राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकावर राहिली आहे.
ब्रिटिश कौन्सिलच्या भारतातील कंट्री डायरेक्टर अॅलिसन बॅरेट MBE यांनी या उपक्रमामुळे भारत-यूके संबंध अधिक दृढ होतील आणि दोन्ही देशांतील तरुणांसाठी नव्या संधी निर्माण होतील, असे सांगितले. तसेच ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशन, चंदीगड येथील डेप्युटी हाय कमिशनर अल्बा स्मेरिग्लियो यांनी शिक्षण हा भारत आणि यूकेमधील मजबूत दुवा असल्याचे नमूद केले.या शाळेच्या नेतृत्वाविषयी येत्या काही आठवड्यांत घोषणा करण्यात येणार असून, त्यामध्ये जागतिक शिक्षण क्षेत्रातील अनुभवी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा समावेश असेल. अधिक माहितीसाठी www.qegurugram.com या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.