रायगड : रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत अलिबाग तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा (शेकाप) सुफडा साफ झाला असून तालुक्यात भगवा फडकला आहे. शेकापला जिल्हा परिषदेच्या सातपैकी एकही जागा जिंकता आली नाही. अनेक वर्षे सत्ता असलेल्या अलिबाग पंचायत समितीवरही सत्ता गमावण्याची नामुष्की शेकापवर ओढवली आहे. अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७ जागांपैकी तब्बल ६ जागा शिवसेनेने जिंकत आपली ताकद दाखवून दिली, तर १ जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात गेली. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोडलेल्या जागांसह शेकापने लढवलेल्या सर्व जागांवर पराभव पत्करावा लागला.
अलिबाग पंचायत समितीच्या १४ जागांपैकी १२ जागा जिंकत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवत इतिहास घडवला. भाजपने १ जागा जिंकली, तर शेकापला केवळ १ जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. चित्रा पाटील तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष राजा ठाकूर यांना पराभव स्वीकारावा लागला. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी मात्र तालुक्यातील निकालातून आपली संघटनात्मक ताकद सिद्ध केली.
जिल्हा परिषदेच्या शहापूर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित नाईक विजयी झाले. शिवसेना शिंदे गटाचे दिलीप भोईर (आवास), सौ. रसिका केणी (आंबेपूर), सचिन राऊळ (चौल), अनंत गोंधळी (कावीर), सौ. मानसी दळवी (थळ) आणि सौ. आदिती दळवी (चेंढर) हे उमेदवार विजयी झाले. यामध्ये आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी सौ. मानसी दळवी आणि सून सौ. आदिती दळवी यांच्या विजयामुळे जिल्हा परिषदेत सासू–सून एकत्र निवडून येण्याचा अनोखा योग घडला आहे. या निकालामुळे अलिबाग तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.