नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा नियोजनासाठी रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाची प्राथमिक समन्वय बैठक नाशिक येथे झाली. या बैठकीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. विभागीय महसूल आयुक्त प्रविण गेडाम, भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, उपविभागीय अधिकारी अर्पित चौहान तसेच राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ प्रस्तावित मल्टीमॉडेल ट्रान्स्पोर्ट हबबाबत सादरीकरण करण्यात आले. हा प्रकल्प रेल्वे, रस्ते व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचे एकत्रित संयोजन साधण्याच्या दृष्टीने तयार करण्यात येणार आहे. यामुळे कुंभमेळ्यादरम्यान होणा-या गर्दीवर नियंत्रण ठेवता येणार असून प्रवाशांचा अनुभव अधिक सुलभ होणार आहे. या बैठकीमुळे रेल्वे व राज्य सरकार यांच्यात प्रभावी समन्वय साधला गेला असून कुंभमेळ्याच्या सुरळीत आयोजनासाठी पायाभूत सुविधा व गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने एकत्रित उपाययोजना आखण्यात आल्या. बैठकीनंतर नाशिकरोड, ओढा, खेरवाडी आणि देवळाली या प्रमुख स्थानकांची संयुक्त पाहणी करण्यात आली. यामध्ये विद्यमान सुविधा तपासून, कुंभमेळ्याच्या पाश्वभूमीवर कोणत्या अतिरिक्त सुविधांची गरज आहे हे निश्चित करण्यात आले.