राज्यात पावसाचा कहर; अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

0

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातला असून, राज्यात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागानं (आयएमडी) पुढील काही दिवसांसाठी आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्वच भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला असून, नागरिकांना अनावश्यक बाहेर पडू नये असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या घाटमाथ्याच्या जिल्ह्यांनाही हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड तसेच विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही पुढील 48 तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत, तर जालना आणि बीड जिल्ह्यांना विशेषतः रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालन्यात पुढील काही तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. 28 सप्टेंबरला मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि लातूर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे शहरांबरोबर ग्रामीण भागातही पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात भिजल्याने शेतकरी हतबल झाला आहे. धरण क्षेत्रांमध्ये पाण्याचा साठा वाढत असल्याने विसर्ग वाढवण्यात आला आहे. कोयना धरण १०० टक्के भरल्यामुळे २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास हा विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो, त्यामुळे कृष्णाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे उजनी धरणातून भीमा नदीपात्रात ९०,००० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून, त्यात आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यातील बहुतांश भागात रस्ते, पूल आणि शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. जनजीवन विस्कळीत झालं असून, प्रशासनानं आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. शाळा बंद ठेवण्याचा निर्णय काही जिल्ह्यांत घेण्यात आला आहे. पुढील ४८ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि हवामान विभागाकडून नागरिकांना सतत सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech