(अनंत नलावडे)
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना
“भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं होतं. त्याचा खास आपल्या ठाकरी शैलीत समाचार घेत, काही मार्मिक शब्दांत चिमटे काढत, तरं काही शेलकी विशेषण वापरत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला.
राज ठाकरे यांनी मंगळवारी आपल्या एक्स अकाऊंट वर एक सविस्तर निवेदन प्रसिद्ध करत भागवतांना खडसावून बजावले की,”भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे……कारण मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो”…….!
आता तुमच्या मुंबईतल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर जरी असले तरी ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती……! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत…..? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या…… असा खास ठाकरी टोलाही ठाकरे यांनी भागवत यांना लगावला.
मोहन भागवत मुंबईत येऊन भाषा व प्रांताविषयी आग्रही राहणे हा एक आजार असला असे जर म्हणत असतील तरी त्यांचा बोलण्याचा रोख हा पूर्णपणे मराठी भाषा, त्यावरून होणारी आंदोलने व महाराष्ट्राची अस्मिता बाळगणे याकडेच होता….. मात्र दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तरं तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो, तिकडे पण ही भावना असल्याकडेही ठाकरे यांनी भागवत यांचे लक्ष वेधले.
राज ठाकरे यांनी भागवत यांना असेही बजावले की, मुळात ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का……? जेंव्हा देशातील ४ / ५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात, तेंव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो.याला तुम्ही आजार म्हणणार का…..? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत…..? अशा शब्दांत खडसावत त्यांना खरमरीत विचारणाही केली.
पुढे आपला संताप व्यक्त करत राज ठाकरे म्हणाले की,”महाराष्ट्र व मुंबईतला मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं.मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला…..? असा सणसणीत इशाराही ठाकरे यांनी भागवत यांनी दिला.
खरंतर संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये.आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही ) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा….. अशा शब्दांत ठाकरे यांनी भागवत यांना खडसावले..
“आता यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका.कारण मी अनेकदा सांगितलं आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेंव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच……! रझा अकादमीच्या दंगली विरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. कारण जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार…..? अशी परखड विचारणाही ठाकरे यांनी केली.