इंदोर : राजा रघुवंशी यांची हत्या पत्नी सोनम रघुवंशी हिनेच केल्याचे समोर आले. या प्रकरणाचा तपास आज(दि. १७) मेघालय पोलिसांनी केला. राजा रघुवंशीचे दोन्ही भाऊ मेघालय पोलिसांच्या तपासावर समाधानी दिसत असून राजा रघुवंशी याचा छोटा भाऊ सचिन रघुवंशीने सोनमला जन्मठेपेची मागणी केली आहे तर मोठा भाऊ विपिनने सोनम रघुवंशीचे एन्काउंटर करण्याचीही मागणी केली आहे.
मेघालय पोलिसांच्या एसआयटीने आरोपी सोनमला आज(दि.१७) घटनास्थळी नेले, तिच्यासोबत इतर आरोपी होते. यावर राजा रघुवंशीचा भाऊ विपिन म्हणाला की, मेघालय पोलिस राजाला न्याय मिळवून देण्यासाठी चांगले काम करत आहेत. जर मी सोनमसमोर आलो तर मी तिला विचारेन की तिने राजाला का मारले. मेघालय पोलिस गुन्ह्याचा बारकाईने तपास करत आहेत, त्यामुळे तपास चांगला चालला आहे. आम्ही या तपासावर खूश आहोत. यावेळी सोनमच्या एन्काउंटरची त्याने मागणी केली. ‘हे लोक आता तुरुंगात जातील, नंतर त्यांना पॅरोलवर सोडले जाईल, एन्काउंटर करणे चांगले, त्यांना लगेच संपवा’, अशी मागणी त्याने केली.
यावेळी सचिन रघुवंशी म्हणाले की, मी मनापासून म्हणतो की मेघालय पोलिस राजा हत्याकांडाचा तपास खूप चांगल्या प्रकारे करत आहेत. आज सोनममुळे मेघालयची बदनामी झाली आहे, यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, तिला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. सोनमला मरेपर्यंत तुरुंगात ठेवले पाहिजे. दरम्यान, आज पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी आणले होते. हत्येच्या कटात पत्नी सोनम सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. आज (दि.१७) पुन्हा २३ मे चा सीन पुन्हा तयार करण्यात आला आणि त्या दिवशी फक्त १८ मिनिटांत राजा रघुवंशीची हत्या कशी झाली हे उघड झाले.