केडीएमसीचा महापौर बसविण्यात काँग्रेसचा सिंहाचा वाटा असेल – राजाभाऊ पातकर
कल्याण : काँग्रेसचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर या जिल्हाध्यक्ष पदावर राजाभाऊ पातकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरीष्ठ उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनी ही नियुक्ती केली असून याबाबतचे नियुक्ती पत्र पातकर यांना पाठविण्यात आले आहे. तर आगामी काळात सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार असून घराघरात काँग्रेस पक्ष पोहोचविण्यासाठी काम करणार असून आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत महापौर बसविण्यात काँग्रेसचा सिंहाचा वाटा असेल असे राजाभाऊ पातकर यांनी सांगितले. पातकर यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्या कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

कॉंग्रेस पक्ष बळकटीकरण करण्यासाठी आपल्या सारख्या बहुजन समाजातील छोट्या कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिली. पक्षाने दिलेल्या या संधीचे सोनं करणार असून काँग्रेसचा पंजा घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार. तर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी जरी राजीनामा दिला असला तरी त्यांना आणि सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार असून कल्याण डोंबिवली महापालिकेत जो महापौर बसेल त्यात काँग्रेसचा सिंहाचा वाटा असेल असे यावेळी राजाभाऊ पातकर यांनी सांगितले.