कोलकाता : आयपीएलच्या ५७ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर एका धावेनी विजय मिळवला.या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियाग परागने इतिहास रचला आहे. रियान पराग हा आयपीएलच्या इतिहासात सलग ६ चेंडूत ६ षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे. ज्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. राजस्थानच्या डावातील १३ व्या षटकातील शेवटच्या पाच चेंडूंवर रियान परागने पाच षटकार मारले. त्यानंतर, १४ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारून, तो सलग ६ चेंडूत ६ षटकार मारणारा आयपीएलमधील पहिला फलंदाज बनला. आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाने आयपीएलमध्ये सलग ६ चेंडूत ६ षटकार मारलेले नाहीत. पण आता रियान परागने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याचबरोबर एकाच षटकात पाच षटकार मारणारा पाचवा खेळाडू ठरला आहे.त्याने मोईन अलीच्या शेवटच्या पाच चेंडूंवर पाच षटकार आणि वरुण चक्रवर्तीच्या दुसऱ्या चेंडूवर एक षटकार मारले. अशाप्रकारे त्याने सलग ६ चेंडूंवर ६ षटकार मारले.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या १३ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूपासून रियान परागने खेळायला सुरुवात केली. स्क्वेअर लेगवर दुसऱ्या चेंडूवर रियान परागने षटकार मारला. त्यानंतर त्याने तिसऱ्या चेंडूवर लाँग ऑनवर षटकार मारला. चौथ्या चेंडूवर स्क्वेअर लेगवर षटकार मारला. लाँग ऑनवर पाचव्या चेंडूवर पुन्हा षटकार मारला. यानंतर, त्याने सहाव्या चेंडूवर लाँग ऑफवर षटकार मारला. परागने मोईनच्या पाच चेंडूत पाच षटकार मारले. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने १४ वे षटक टाकले. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर, रियान पराग स्ट्राईकवर आला आणि त्याने चेंडू रिव्हर्स स्वीप करून सीमारेषेपलीकडे पाठवला. अशाप्रकारे, रियान पराग हा आयपीएलमध्ये सलग ६ चेंडूत ६ षटकार मारणारा पहिला खेळाडू बनला आहे.