नारायण राणे यांनी केली पुतळा आणि परिसराची पाहणी
सिंधुदुर्ग : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अत्यंत सुबक आणि देखणा असल्याचे खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. हा पुतळा पाहिल्यानंतर खरा महाराजांचा पुतळा कसा असावा याचे भविष्यात जर उदाहरण द्यावे लागले तर मालवणच्या या पुतळ्याचे द्यावे लागेल. इतका सुबक, सुंदर, देखणा असा हा पुतळा आहे, असे मत खासदार नारायण राणे यांनी मालवण येथे व्यक्त केले. दरम्यान ११ मे ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या पुतळ्याची पाहणी करण्यास येणार असून त्यांच्या हस्ते या पुतळ्याचे पूजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मेढा-राजकोट येथे नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हाधिकारी अनिल पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, तहसीलदार वर्षा झालटे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, दीपक पाटकर, सुदेश आचरेकर, बाबा मोंडकर, बाबा परब, महिमा मयेकर, राणी पराडकर, अमिता निवेकर, सोनाली पाटकर, अंजना सामंत, निलिमा सावंत, गणेश कुशे, राजू वराडकर, पंकज सादये, मंदार लुडबे, भाई मांजरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजित पाटील, बंदर अधिकारी रजनीकांत पाटील, मुख्याधिकारी संतोष जिरगे, पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सह अन्य विभागांचे अधिकारी, भाजपचे, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकोट येथील छत्रपतींचा पुतळा आणि परिसराची पाहणी केल्यानंतर राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार व त्यांचे पुत्र अनिल सुतार यांच्या माध्यमातून राजकोट येथे छत्रपतींचा आकर्षक, सुबक, देखणा असा पुतळा साकारण्यात आला आहे. त्यामुळे सुतार यांनी या पुतळ्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानत आहे. या पुतळ्याची पाहणी तसेच पूजन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत. महाराजांच्या पुतळ्यालगतचा परिसर कसा असावा त्याचा आराखडा बनवला जात आहे. किल्ल्याच्या भिंतीची उंची कमी करून महाराजांच्या पुतळ्यासह चारही बाजूंनी समुद्र दिसावा यासाठी भिंतीची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. समुद्रातून नौका पुतळ्याच्या ठिकाणी याव्यात यासाठी तेथे एक जेरी असावी बाकीचा परिसर लँडस्केपने केला जावा यासाठी राज्य सरकार आणि आम्ही लोकप्रतिनिधी मिळून मालवणकर मिळून आम्ही हे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आज श्री. सुतार यांची झालेली भेट मालवणची शोभा वाढविण्यासाठी अतिशय योग्य ठरणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.