५००० कर्मचाऱ्यांना दिलासा; कंत्राटी शिक्षकही होणार कायम…

0

आमदार संजय केळकर यांचा कर्मचाऱ्यांकडून हृदय सत्कार..
ठाणे : ठाणे महापालिकेत झालेल्या संयुक्त बैठकीत आयुक्तांनी दिलेल्या तत्वतः मान्यतेनुसार सुमारे फायलेरिया विभागात कर्मचाऱ्यांसह पाच हजार कंत्राटी कामगारांना दिलासा मिळणार असून अनेक वर्षे सेवेत असलेल्या कंत्राटी शिक्षकांना कायम सेवेत घेण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याने गुरुवारी शासकीय विश्रामगृहात त्यांचा हृदय सत्कार कर्मचाऱ्यांनी केला.

ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत आमदार संजय केळकर, आयुक्त सौरभ राव आणि कामगार प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीत आयुक्तांनी दिलेल्या तत्वतः मान्यतेनुसार कंत्राटी कामगारांना सेवा सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे महापालिकेत विविध विभागात सुमारे पाच हजार कंत्राटी कामगार काम करत असून त्यांची पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारांना नोटीसा देणे, किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा, अनुकंपा, वारसा हक्क आदी सुविधा देणे याबाबत आयुक्तांनी तातडीने हे प्रश्न सोडविण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेच्या विविध शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक अनेक वर्षांपासून अध्यापनाचे काम करत आहेत. आयुक्तांच्या तत्वतः मान्यतेमुळे १७ शिक्षकांना कायम सेवेत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सत्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या या शिक्षकांनी त्यांच्या भावना व्यक्त करत श्री.केळकर यांचे आभार मानले. ‘आम्ही अनेक लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला, पण कोणीच दाद न दिल्याने आम्ही नैराश्यात गेलो होतो. अखेर आमदार संजय केळकर यांनी आमचे दुःख जाणून घेतले आणि कमी वेळात आम्हाला न्याय मिळवून दिला. त्यांच्यामुळे आमचे भवितव्य सावरले असून त्यांनी खऱ्या अर्थाने पितामह म्हणून भूमिका बजावली, अशा भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या.

सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्कानुसार नोकरी, घर देण्यात येते, परंतु फायलेरिया विभागातील फील्ड कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळत नव्हता. आयुक्तांच्या बैठकीत या विषयावरही चर्चा करण्यात येऊन ३०० कर्मचाऱ्यांना देखील हा लाभ मिळणार आहे. अनुकंपा तत्त्वावरील गेली १२ वर्षे प्रलंबित ५० पेक्षा अधिक नियुक्त्या मार्गी लागणार आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले ७ व्या वेतन आयोगाचे हप्ते, १०-२०-३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना आणि ६० मिनिटांची लेट एन्ट्री सवलत याबाबत आमदार संजय केळकर यांनी घेतलेली ठाम भूमिका आम्हाला दिलासादायक ठरली आहे, अशा भावना कर्मचारी प्रतिनिधींनी व्यक्त केल्या.

सत्कार स्वीकारताना आमदार संजय केळकर म्हणाले की, “आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आणि ‘समान काम समान वेतन’ या तत्त्वाची अंमलबजावणी होईपर्यंत आमचा लढा थांबणार नाही. कर्मचाऱ्यांच्या घामाचा दाम त्यांना सन्मानाने मिळालाच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सत्कार सोहळ्यात उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेविका अनिता ठाकूर कामगार प्रतिनिधी अजित मोरे, सुधाकर शिंदे, नितीन मडके, दत्ता घुगे, किशोर गायकवाड, शैला नाईक, वनिता हांडे आदी उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech