मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही व्यक्ती, संघटना किंवा विचारधारेच्या विरोधात नाही. तर संघ केवळ राष्ट्रनिर्मितीच्या उद्देशाने सातत्याने कार्यरत आहे. संघ अर्धसैनिक संघटना नाही. तसेच आम्हाला सत्तेची, प्रतिष्ठेची किंवा लोकप्रियतेची आकांक्षा देखील नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या “नवे क्षितिज” या कार्यक्रमात डॉ. भागवत बोलत होते.
याप्रसंगी डॉ. भागवत म्हणाले की. संघाचे कार्य आगळे-वेगळे असून ते समजून घेण्यासाठी केवळ देशातूनच नव्हे, तर परदेशातूनही लोक येतात. जगातील पाचही खंडांतून लोक संघाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी येतात आणि त्याबाबत कौतुहल व्यक्त करतात. कुणाशी तरी स्पर्धा करायची म्हणून संघाची स्थापना झालेली नाही. तसेच संघ कुठल्याही संघटनेच्या विरोधात देखील नाही. संघाची तुलना अनेकदा इतर संघटना, संस्था किंवा राजकीय पक्षांशी केली जाते, त्यामुळे अनेकदा गैरसमज निर्माण होतात, असे त्यांनी सांगितले. संघात स्वयंसेवकांना शारीरिक प्रशिक्षणांतर्गत लाठी चालविण्याचे शिक्षण दिले जाते, मात्र संघ ना लष्करी संघटना आहे, ना कुस्तीचा आखाडा. येथे भारतीय परंपरेवर आधारित गीत, संगीत, शिस्त आणि संस्कार यांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास व सामाजिक समरसतेवर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इतिहासाचा संदर्भ देताना डॉ. भागवत यांनी सांगितले की इंग्रजांनी काँग्रेसची स्थापना ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ म्हणून केली होती, मात्र भारतीयांनी तिला स्वातंत्र्यलढ्याचे प्रभावी माध्यम बनवले. त्याचप्रमाणे संघही समाजात सकारात्मक आणि रचनात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. हिंदू ओळखीबाबत विचार मांडताना त्यांनी सांगितले की देशात हिंदूंचे 4 वर्ग दिसून येतात. पहिला वर्ग अभिमानाने स्वतःला हिंदू म्हणतो, दुसरा सहजपणे आपली ओळख स्वीकारतो, तिसरा संकोचाने आपली ओळख व्यक्त करतो, तर चौथा वर्ग आपली ओळख विसरलेला आहे किंबहुना ज्याला ओळख विसरायला लावले गेले आहे. काही शक्ती या शेवटच्या वर्गाला पूर्णतः विस्मृतीत ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
धर्मनिरपेक्षतेबाबत भाष्य करताना संघप्रमुख म्हणाले की “धर्मनिरपेक्षता” या शब्दाऐवजी “पंथनिरपेक्षता” हा शब्द अधिक योग्य आहे, कारण धर्म हा जीवनाचा मूलाधार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट संघाशी जोडून पाहणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्ष हा एक राजकीय पक्ष आहे. त्यामध्ये कार्य करणारे स्वयंसेवक हे संघाचे सदस्य नसून समाजसेवक म्हणून काम करतात. भाषा आणि संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे अनेक भाषा, देवी-देवता, खानपानाच्या पद्धती आणि परंपरा आहेत, मात्र एक सामायिक सांस्कृतिक चेतना सर्वांना जोडते, आणि तीच हिंदू संस्कृती म्हणून ओळखली जाते असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला देशातील नामवंत उद्योगपती तसेच मनोरंजन विश्वातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. उद्योग क्षेत्रातून राधाकृष्ण दमाणी, अजय पिरामल, दीपक पारेख, सज्जन जिंदल, निलेश शाह आणि आशीष कुमार चौहान सहभागी झाले होते. तर चित्रपट व मनोरंजन क्षेत्रातून सलमान खान, हेमा मालिनी, रोनी स्क्रूवाला, विनीत जैन, सुभाष चंद्रा, नितेश तिवारी, मोहित सूरी, रमेश तुराणी, बोनी कपूर, अदनान सामी, ओम राऊत, विपुल शाह, प्रसाद ओक आणि इंद्र कुमार उपस्थित होते. याशिवाय स्वामी स्वरूपानंद, अक्षत गुप्ता तसेच इस्रायल, ब्रिटन आणि इटलीचे राजनयिकही या कार्यक्रमात उपस्थित होते.