नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या जिहादी दहशतवाद्यांनी 26 हिंदू पर्यटकांचे टार्गेट किलींग केले होते. त्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्या तणाव वाढला आहे. यापार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज, सोमवारी दूरध्वनीवर संपर्क करून चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत दहशतवादविरोधी लढाईत रशिया भारताच्या पाठिशी असल्याचे पुतीन यांनी मोदींना सांगितले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. या हल्ल्यात २६ हिंदू पर्यटकांचा बळी गेला होता. पुतीन यांनी या हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांसाठी शोक व्यक्त केला आणि भारताच्या दहशतवादाविरोधातील लढ्यात “पूर्ण पाठिंबा” देण्याचे आश्वासन दिले.
रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी ठामपणे सांगितले की, “या हल्ल्यामागील दोषींना आणि त्यांच्या समर्थकांना न्यायासमोर आणलेच पाहिजे. याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट शेअर केली आहे. ही घोषणा अशा वेळेस आली आहे जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पहलगाममधील बायसरन खोर्यात घडलेला हा हल्ला पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील स्थळी झाला होता. पुतीन यांच्या या प्रतिक्रियेने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक महत्त्वाचा पाठिंबा मिळाला आहे.