नवी दिल्ली : बांगलादेशची राजधानी ढाका येथे माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमादरम्यान घडलेली एक घटना सध्या संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरली आहे.या प्रसंगी मे महिन्यातील संघर्षानंतर प्रथमच एखाद्या भारतीय नेत्याने पाकिस्तानी नेत्याशी भेट घेतली आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष यांच्यात अनौपचारिक स्वरूपाची भेट झाली.
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्ली सचिवालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, अध्यक्ष अयाज सादिक बांगलादेशच्या संसदेत खालिदा झिया यांच्यासाठी ठेवलेल्या शोकपुस्तिकेत संदेश लिहीत असताना त्यांची परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी भेट झाली. यावेळी दोघांनीही हस्तांदोलन करून एकमेकांचे अभिवादन केले. दोन्ही नेते तेथे खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी पोहोचले होते.
या भेटीचा फोटो स्वतः बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी शेअर केला आहे. युनूस यांनी ‘एक्स’ वर सरदार अयाज सादिक आणि एस. जयशंकर यांच्या हस्तांदोलनाचा फोटो शेअर करत लिहिले, “बुधवारी ढाका येथे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमापूर्वी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेऊन त्यांचे अभिवादन केले.”