मुंबई : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘विश्वकल्याणार्थ रामराज्यासमान सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी गोव्यात १७ ते १९ मे या कालावधीत गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी समर्पित संत, महंत, हिंदुत्वाचे शिलेदार, विचारवंत, केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच २५ हजारांहून साधक, धर्मप्रेमी हिंदू यांची उपस्थिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. हा दिव्य शंखनाद हा रामराज्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल असेल. या महोत्सवासाठी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतून २ हजार ५०० हून अधिक साधक, धर्मप्रेमी हिंदु उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे ७ मे या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, विरार येथील श्री जीवदानी देवी संस्थानचे अध्यक्ष श्री. प्रदीप तेंडोलकर आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. सतीश कोचरेकर हे उपस्थित होते.
श्री. अभय वर्तक पुढे म्हणाले, ‘भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर अत्यंत अचूक आणि निर्णायक एअर स्ट्राइक करून ती सर्व तळे उद्ध्वस्त केली आहेत. सनातन संस्थेच्या वतीने या निर्णायक लष्करी कारवाईचे आम्ही मन:पूर्वक स्वागत करतो. संपूर्ण हिंदू समाज हा भारतीय सैन्याबरोबर एकजुटीने उभा आहे’. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २५ वर्षे सनातन संस्था आदर्श आणि संस्कारी पिढी घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही देशात रामराज्य-स्वरूप ‘सनातन राष्ट्रा’साठी सामूहिक संकल्प केला आहे. याद्वारे सर्व आध्यात्मिक संस्था आणि हिंदू संघटना यांच्यातील धर्मबंधुत्व अधिक दृढ होईल. सध्याच्या भारतासमोर उभ्या असलेल्या अंतर्गत आणि बाह्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सनातन धर्म, त्याची मूल्ये आणि त्याचे रक्षण नितांत आवश्यक झाले आहे. एकूणच गो, गंगा, गायत्री, मंदिरे, वेदादी धर्मग्रंथ यांना पुनर्वैभव प्राप्त करून देणार्या ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे. फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणारा भव्य लोकोत्सव धर्म आणि अध्यात्म यांची दिव्य ज्ञानगंगा प्रवाहित करणारा ठरेल.
या महोत्सवाला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर, पतंजली योगपीठाचे संस्थापक प.पू. योगऋषि स्वामी रामदेव, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते पूज्यश्री देवकीनंदन ठाकूर महाराज, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय, तेलंगाणा येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह, तसेच काशी-मथुरा येथील मंदिरांचा खटला लढवणारे अधिवक्ता विष्णु जैन आदी अनेक मान्यवरांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे.
या भव्य-दिव्य महोत्सवासाठी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री श्री. नितेश राणे, महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री श्री. भरतशेठ गोगावले, आमदार श्री.प्रशांत ठाकूर, आमदार श्री.विक्रांत पाटील, भारताचार्य सु.ग.शेवडे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री.रणजित सावरकर, पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.रवींद्र प्रभुदेसाई, मेढे (वसई) येथील ‘श्री परशुराम तपोवन आश्रमा’चे संस्थापक पू. भार्गवश्री बी.पी. सचिनवाला, जैनमुनी विनम्रसागरजी महाराज, राष्ट्रीय व्याख्याते डॉ.सच्चिदानंद शेवडे, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते श्री.दुर्गेश परुळकर, प्रख्यात सर्जन आणि लेखक डॉ.अमित थडानी, मुंबादेवी देवस्थानचे प्रबंधक श्री.हेमंत जाधव, रायगड येथील शिवराज्याभिषेक सेवा समितीचे अध्यक्ष श्री.सुनील पवार आदी मान्यवरांसह मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधीही या महोत्सवाला सहभागी होणार आहेत.
‘सनातन राष्ट्रा’साठी एक कोटीचा रामनाम जपयज्ञ व संतसभा ! : या महोत्सवा’चे ‘धर्मेण जयति राष्ट्रम् ।’ (अर्थ: धर्मामुळे राष्ट्राचा विजय होतो) हे घोषवाक्य आहे. ‘सनातन राष्ट्रा’साठी ‘रामराज्य संकल्प जपयज्ञा’द्वारे एक कोटी श्रीरामनामाचा जप करण्यात येणार आहे. देशभरातील सनातन धर्मीय संत, महंत तथा धर्मगुरु यांच्या तेजस्वी वाणीद्वारे सनातन राष्ट्राचे उद्घोष करण्यासाठी संतसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हिंदु राष्ट्ररत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार वितरण : वर्षानुवर्षे सनातन धर्माच्या सेवेसाठी समर्पित होऊन विशेष कार्य करणार्या हिंदूवीरांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ हा जीवनगौरव पुरस्कार, तसेच धर्मासाठी लढणार्या धर्मरक्षकांना ‘सनातन धर्मश्री’ हा पुरस्कार वंदनीय संतांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. लोककलेचे सादरीकरण आणि शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन ! : या भव्य कार्यक्रमातून गोमंतकातील लोककलांचेही सादरीकरण करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील प्राचीन शस्त्रास्त्रे, तसेच सनातन संस्कृती, राष्ट्र, कला, आयुर्वेद, आध्यात्मिक वस्तू यांचे भव्य प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.
संतांच्या पादुकांचे दर्शन ! : या कार्यक्रमाच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज (इंदूर), समर्थ रामदासस्वामी, सज्जनगडचे श्रीधरस्वामी, श्री कानिफनाथ स्वामी, प.पू. टेंबेस्वामी, समर्थ शिष्य श्री कल्याणस्वामी, श्री साईबाबा, संत वेणाबाई, श्री सिद्धारूढस्वामी (हुबळी), प.पू. गगनगिरी महाराज, प.पू. गोंदवलेकर महाराज आदी १० हून अधिक संतांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ सर्वांना घेता येणार आहे. महाधन्वंतरी यज्ञ ! : १९ मे या दिवशी विश्वकल्याणार्थ तथा सनातन धर्मीयांच्या आरोग्यासाठी महाधन्वंतरी यज्ञ होणार आहे. या कार्यक्रमाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी SanatanRashtraShankhnad.in संकेतस्थळाला भेट द्या !