नवी दिल्ली : दूरसंचार मंत्रालयाने स्मार्टफोन निर्मात्यांना निर्देश दिले आहेत की येत्या ३० दिवसांत बाजारात येणाऱ्या सर्व नवीन मोबाइल फोनमध्ये सरकारी साइबर सुरक्षा अॅप ‘संचार साथी’ अनिवार्यपणे प्री-लोड केलेले असावे आणि हे अॅप वापरकर्ता फोनमधून डिलीट करू शकणार नाही याची खात्री निर्मात्यांनी करावी. विद्यमान फोनसाठीही सॉफ्टवेअर अपडेटद्वारे हे अॅप इंस्टॉल करण्यावर सरकारने जोर दिला आहे. सरकारच्या माहितीनुसार ‘संचार साथी’च्या मदतीने जानेवारीपासून आतापर्यंत सात लाखांहून अधिक हरवलेले किंवा चोरीला गेलेले फोन शोधून काढण्यात यश आले असून केवळ ऑक्टोबर महिन्यात तब्बल ५० हजार फोन परत मिळाले आहेत. डुप्लिकेट किंवा बनावट आयएमईआय क्रमांकांमुळे वाढत चाललेला साइबर धोका देशाच्या दूरसंचार व्यवस्थेसाठी गंभीर ठरत असून फसवणूक, नेटवर्कचा गैरवापर आणि साइबर गुन्ह्यांत मोठी वाढ होत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, या सरकारी अनिवार्यतेबाबत निजता समर्थक संस्था आणि टेक कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यापूर्वीही अशाच एका सरकारी अँटी-स्पॅम अॅपबाबत अॅपल, सॅमसंग, व्हिवो, ओप्पो आणि शाओमी यांसारख्या कंपन्यांनी आक्षेप घेतला होता. डिजिटल अधिकार तज्ज्ञ मिशी चौधरी यांनी सरकारचा हा निर्णय वापरकर्त्याच्या संमतीकडे दुर्लक्ष करणारा असून चिंताजनक असल्याचे नमूद केले. तर Counterpointचे रिसर्च डायरेक्टर तरुण पाठक यांनी अॅप प्री-इंस्टॉल करण्याची सक्ती करण्याऐवजी वापरकर्त्यांना स्वतःहून अॅप स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करावे, ज्यामुळे निजता आणि सुरक्षा यामध्ये संतुलन राखता येईल, असा सल्ला दिला. ‘संचार साथी’ हे सेंट्रल रजिस्ट्रीवर आधारित अॅप असून त्याद्वारे संशयित कॉलची तक्रार नोंदवता येते, आयएमईआय क्रमांक तपासता येतो तसेच चोरी किंवा हरवलेला फोन ब्लॉक करण्याची सोय मिळते. तसेच फसवणूक करणाऱ्या मोबाईल कनेक्शन्सची ओळख करून त्यांना डिस्कनेक्ट करण्यासाठीही हे अॅप उपयुक्त ठरत आहे.
सरकारच्या मते साइबर धोके रोखणे, चोरी झालेले फोन शोधणे आणि बनावट मोबाइलचे प्रमाण कमी करणे यासाठी हे अॅप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सध्या ‘संचार साथी’ अॅप अॅपल आणि गुगल प्ले स्टोअर वर स्वेच्छेने डाउनलोड करता येते, मात्र आता नवीन फोनमध्ये ते अनिवार्य असणार आहे. प्रत्येक मोबाइलमध्ये असणाऱ्या १४ ते १७ अंकी विशिष्ट क्रमांकाला आयएमईआय म्हणतात आणि हा क्रमांक फोनची युनिक ओळख असल्यामुळे चोरीच्या प्रसंगी नेटवर्क ऍक्सेस बंद करणे किंवा लोकेशन ट्रॅक करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.