खा. नरेश म्हस्के यांना मानाचा `संसद रत्न’ पुरस्कार जाहीर

0

नवी दिल्ली : अभ्यासपूर्ण भाषणांनी संसदेसह देशाचे लक्ष वेधणारे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना मानाचा `संसद रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये नरेश मस्के यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संसद रत्न पुरस्काराचे संस्थापक प्राइम पॉइंट श्रीनिवासन आणि संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शनी राहुल यांनी पुरस्काराची घोषणा नवी दिल्ली येथे केली.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार, २०१० मध्ये प्राइम पॉइंट फाउंडेशन आणि ई-मॅगझिन प्रेसेन्स यांनी संसद रत्न पुरस्कारांची स्थापना केली. मे २०१० मध्ये चेन्नई येथे झालेल्या पहिल्या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटनही डॉ. कलाम यांनी केले होते. उल्लेखनीय म्हणजे हंसराज गंगाराम अहिर हे या पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता होते. हे पुरस्कार नागरी समाजाच्या वतीने प्रदान केले जातात.

२०२४ पर्यंत १४ पुरस्कार समारंभांमध्ये १२५ पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत, ज्यामध्ये वैयक्तिक संसद सदस्य आणि संसदीय स्थायी समित्यांना मान्यता देण्यात आली आहे. प्रतिष्ठित पुरस्कार विजेते संसद सदस्य आणि नागरी समाजाचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेली ज्युरी समिती कामगिरीच्या डेटाच्या आधारे पुरस्कार विजेत्यांची नामांकने करते. हा डेटा लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयांच्या अधिकृत नोंदी तसेच पीआरएस कायदेविषयक संशोधनातून मिळवला जातो. कामगिरी निर्देशकांमध्ये सुरु झालेल्या वादविवादांची संख्या, खाजगी सदस्यांची विधेयके सादर करण्यात आली आणि उपस्थित केलेले प्रश्न यांचा समावेश आहे.

प्रतिष्ठित संसद रत्न पुरस्कार २०२५ प्राप्त करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतील १७ खासदारांसह दोन संसदीय स्थायी समित्यांना नामांकन देण्यात आले आहे. केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे (एनसीबीसी) अध्यक्ष हंसराज गंगाराम अहिर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीने हे नामांकन केले आहे. जुलै २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात नवी दिल्ली येथे होणाऱ्या १५ व्या संसद रत्न पुरस्कार समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील. महाराष्ट्रातील खासदार नरेश गणपत म्हस्के (शिवसेना), स्मिता उदय वाघ (भाजप), अॅङ गायकवाड वर्षा एकनाथ (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), प्रा. मेधा विश्राम कुलकर्णी (भाजप), अरविंद गणपत सावंत (शिवसेना उबाठा) यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

भारतीय विद्यार्थी सेनेपासून नरेश म्हस्के यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. नगरसेवक, सभागृह नेते, ठाणे महापौर ते ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार असा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी ते संसद गाजवत आहेत. संसदेत पहिलीच टर्म असली तरी खासदार नरेश म्हस्के यांची महत्वपूर्ण केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार समितीच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी आणि वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ छाननीसाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. रेल्वे, प्रवासी जलवाहतूक, शहर सुधारणा आणि गृहनिर्माण समितीचे सदस्य म्हणून देशातील शहरांच्या विकासासाठी केलेली मांडणी, कृषि, परराष्ट्र धोरणासह देशाच्या हिताच्या दृष्टीने मांडण्यात आलेले धोरण, प्रस्ताव यावर चर्चा, सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कठोर कायदा करण्यासाठी लावून धरलेली आग्रही मागणी, बँक ठेवीदारांच्या संपूर्ण ठेवीवर १०० टक्के विमा सुरक्षित करण्यासाठी पाठपुरावा, विविध धोरणावर चर्चा, प्रश्नोत्तरात सक्रिय सहभाग, संसदेत लक्षणीय उपस्थिती, अर्थसंकल्पीय आधिवेशनातही महत्वपूर्ण चर्चा, देश हितासाठी शिवसेना पक्षाच्या मुख्य प्रवक्ता या नात्याने मांडलेली भूमिका या सर्व कामकाजाची दखल घेऊन खासदार नरेश म्हस्के यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

शिवसेना मुख्यनेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा, शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन, दिलेले प्राधान्य यामुळेच हा पुरस्कार मला जाहिर झाला आहे. या दोन्ही नेत्यांसह मला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवणारा मतदार राजा, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा कार्यकर्त्यांना या पुरस्काराचे मी श्रेय देत असल्याची प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech