नवी दिल्ली : माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. येत्या २ मे रोजी सकाळी १०.३० वाजता पूजा खेडकरला दिल्ली गुन्हे शाखेसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी २१ मे रोजी होणार आहे.
पुजा खेडकर प्रकरणी आज (२१ एप्रिल) दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी दिल्ली पोलिसांनी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. तर यावर युक्तिवाद करत असताना कोठडीत चौकशीची आवश्यकता नसल्याचे मत पूजा खेडकरच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले. दरम्यान जोपर्यंत चौकशीत सहकार्य करेल तोपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम असेल. मात्र, आतापर्यंत पूजा खेडकरची ठोस चौकशी झालेली नसल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. तर पूजा खेडकर चौकशीसाठी हजर राहील आणि चौकशीत सहकार्य करेल, अशी ग्वाही खेडकरांच्या वकिलांनी यावेळी देण्यात आली.
दरम्यान, यावेळी दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, पूजा खेडकर १२ वेळा परीक्षेला बसल्या. जरी त्या दिव्यांग असल्या तरीही ९ वेळा परीक्षा दिल्या जाऊ शकतात. त्यांनी नावे बदलली आणि १२ वेळा परीक्षा दिली. तर युपीएससीच्या वकिलांनी युक्तिवाद करत असताना सांगितले की, पूजा खेडकरच्या पाठीशी एक पॉवरफुल सिस्टम आहे. तर यावर प्रतिवाद करतांना पूजा खेडकरचे वकील म्हणाले की, खेडेकर दिव्यांग आहेत आणि त्यासाठीचे प्रमाणपत्र तपासणी एम्सने केले आहे.
यावर न्यायमूर्ती बेला त्रिवेदी म्हणाल्या की, पूजा खेडेकर या चौकशीसाठी यायला तयार नाही का? पूजा खेडकरला बोलवा, त्यांना चौकशीसाठी बोलवा. मग बघूया त्या चौकशीतून काय समोर येईल. तुम्ही चौकशीसाठी बोलवा आणि तुम्ही आरोपपत्र दाखल करू शकता, पूजाने सहकार्य करावे लागेल, असे निर्देश देत पूजा खेडकरला पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश देत जोपर्यंत चौकशीत सहकार्य करेल तोपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम राहील, असे निर्देश दिले.
पूजा खेडकरवर यूपीएससी परीक्षेत ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर करून जास्त संधी मिळवल्याचा आणि कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने २३ डिसेंबर २०२४ रोजी तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. सदर प्रकरणात प्रथमदर्शी “मोठा कट” असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं होतं. यूपीएससीने खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आणि त्यांना भविष्यातील सर्व परीक्षांसाठी बंदी घातली आहे. मात्र पूजा खेडकर हिने सर्व आरोप फेटाळले आहेत.