राजस्थानात ९ वर्षीय विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

0

शाळेच्या मैदानात खेळताने अचानक कोसळली
नागौर : राजस्थानच्या नागौर जिल्ह्यामधील गोटन येथे एका 9 वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. दिव्या राजेंद्र बापेडिया असे या बालिकेचे नाव असून ती गोटन येथील गोटन इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी होती. यासंदर्भातील माहितीनुसार दिव्या बापेडिया नेहमीप्रमाणे 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.48 वाजता शाळेत पोहचली.प्रार्थना सुरू होण्यापूर्वी ती इतर विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या क्रीडांगणावर खेळत होती. त्याच वेळी ती अचानक तोल जाऊन खाली कोसळली व बेशुद्ध झाली. शाळेच्या प्रशासनाने तत्काळ हालचाल करून तिला गोटन येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत मृत्यूचे कारण हृदयविकाराचा तीव्र झटका असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तिच्या शरीरावर कोणतीही बाह्य दुखापत आढळली नाही तसेच पूर्वी कोणत्याही गंभीर आजाराचा इतिहास नसल्याची माहिती देण्यात आली. घटनेचे सीसीटीव्ही चित्रफीत समोर आली असून त्यात दिव्या खेळत असताना अचानक कोसळताना दिसत आहे. ही चित्रफीत सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या 4 महिन्यांपूर्वी दिव्याच्या मोठ्या भावाचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, अशी माहिती आहे. अल्पावधीत एका कुटुंबातील 2 मुलांचे निधन झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.नातेवाईकांनी शवविच्छेदनास नकार दिल्यानंतर आवश्यक शासकीय प्रक्रिया पूर्ण करून पार्थिव त्यांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे लहान मुलांमधील वाढत्या हृदयविकाराच्या धोक्यांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech