ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन

0

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय शिल्पकलेचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ शिल्पकार पद्मश्री, महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे बुधवारी रात्री निधन झाले. नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी मध्यरात्री सुमारे १.३० वाजता त्यांनी वयाच्या १०१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दीर्घायुष्य लाभलेले राम सुतार हे अखेरपर्यंत सृजनशीलतेशी नाते जपणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय कला, संस्कृती आणि शिल्पकलेच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कला क्षेत्रातून तसेच विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये उभारलेल्या त्यांच्या भव्य शिल्पकृतींनी भारतीय शिल्पपरंपरेला जागतिक ओळख मिळवून दिली. स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक राष्ट्रीय नेत्यांची स्मारके, तसेच एकता आणि प्रेरणेचे प्रतीक ठरलेले पुतळे ही त्यांची अमूल्य देणगी मानली जाते. जगभरात २०० हून अधिक शिल्पांची निर्मिती करणारे राम सुतार हे नाव केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आदराने घेतले जात होते. दिल्लीतील संसद भवन परिसरात उभारलेली त्यांची शिल्पे आजही भारतीय लोकशाहीची साक्ष देतात. राम सुतार यांना त्यांच्या योगदानाबद्दल पद्मश्री, पद्मभूषण तसेच महाराष्ट्र भूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन हा पुरस्कार त्यांच्या हाती सोपवला होता. या भेटीदरम्यान राम सुतार यांनी महाराष्ट्र अभिमान गीत गायले होते, तो क्षण अनेकांसाठी भावूक ठरला.

अलीकडेच अंदमान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते, तो पुतळा देखील राम सुतार यांच्या कलाकृतीचा भाग होता. त्यांच्या शिल्पांमधील सूक्ष्म बारकावे, भावभावना आणि वास्तववादी मांडणी ही त्यांच्या कलेची ओळख होती. राम वनजी सुतार यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९२५ रोजी धुळे जिल्ह्यातील गोंडूर या गावात झाला. प्रारंभी त्यांनी श्रीराम कृष्ण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकलेचे धडे घेतले आणि पुढे मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून औपचारिक शिक्षण पूर्ण केले. १९५९ साली त्यांनी दिल्लीत माहिती व दूरसंचार मंत्रालयात नोकरी स्वीकारली, मात्र काही वर्षांतच त्यांनी शासकीय सेवा सोडून पूर्णवेळ शिल्पकार म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्लीमध्ये स्वतःचा स्टुडिओ उभारून त्यांनी आपल्या कलेचा स्वतंत्र प्रवास सुरू केला.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सर्वात भव्य आणि ऐतिहासिक प्रकल्प
जगातील सर्वात उंच, १८२ मीटर उंचीचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा राम सुतार यांच्या आयुष्यातील सर्वात भव्य आणि ऐतिहासिक प्रकल्प मानला जातो. या शिल्पाच्या संकल्पनेपासून ते डिझाइनपर्यंत संपूर्ण सर्जनशील वाटचाल त्यांनीच केली. सुमारे ६० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ५० हून अधिक भव्य शिल्पांची निर्मिती केली. संसद भवनातील महात्मा गांधी यांची मूर्ती, तसेच तिच्या प्रतिकृती इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया येथे पोहोचल्या. १९५३ साली मेयो गोल्ड मेडल मिळवणारे राम सुतार हे केवळ शिल्पकार नव्हते, तर भारतीय संस्कृतीचे जागतिक प्रतिनिधी होते.

गाजलेली शिल्पे : राम सुतार हे जागतिक ख्यातीचे शिल्पकार होते. त्यांच्या कलाकृतीमध्ये मुख्यत: इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन दिसते. त्यांना वर्ष २०१६ मध्ये पद्मभूषण आणि १९९९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. त्यांच्या शिल्पकलेत भारतीय संस्कृती, इतिहासाचा आणि भावनेचा अनोखा मिलाफ दिसून येतो.
छत्रपती शिवरायांचा पुतळा : मालवण -राजकोट येथील समुद्र किनाऱ्यालगतचा छत्रपती शिवरायांचा पुतळा राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी तयार केला.
महात्मा गांधींचे पुतळे : देशभरातच नाही तर जगभरात त्यांनी महात्मा गांधी यांचे शिल्प साकारले आहेत.
स्टॅच्यू ऑफ युनिटी : राम सुतार यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच 182 मीटर पुतळा उभारला. गुजरात राज्यातील केवडिया येथे हा पुतळा दिमाखात उभा आहे.
बुद्ध आणि महावीर : भगवान बुद्ध, महावीर आणि विवेकानंद यांच्यासह इतर महान विभूतींच्या मूर्ती अत्यंत सुबक आणि चित्तवेधक आहे. त्या पाहताना मनुष्य त्या कलाकृतीत हरवून, हरखून जाते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा : काही दिवसांपूर्वी अंदमान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा पुतळाही राम सुतार यांनी साकारला होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech