नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांनी गुरुवारी, हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाच्या मागणीनंतर विरोधी पक्षनेत्या आतिशी यांचा व्हिडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी १५ दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. गोंधळ सुरूच राहिल्याने सभापतींनी तिसऱ्यांदा दुपारी १ वाजेपर्यंत सभागृह तहकूब केले होते.
सकाळी ११ वाजता सभागृहाची बैठक झाली तेव्हा, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सदस्यांनी विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी गुरु तेग बहादूर यांच्यावरील कथित टिप्पणीवरून गोंधळ घातला. परिणामी, सभापतींनी सभागृह अर्ध्या तासासाठी तहकूब केले. सभागृह पुन्हा सुरू झाल्यावर, सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांचा गोंधळ सुरूच राहिला.
गोंधळादरम्यान कॅबिनेट मंत्री कपिल मिश्रा यांनी आतिशी यांच्याबद्दल टिप्पणी केली, ज्यामुळे आम आदमी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला. हे पाहता, सभापतींनी सभागृह अर्ध्या तासासाठी तहकूब केले. सभागृहाचे कामकाज तिसऱ्यांदा सुरू झाल्यावरही गोंधळ सुरूच राहिला आणि कामकाज तिसऱ्यांदा अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले.