शिवसेनेचे सात उमेदवार बिनविरोध विजयी, ठाकरेंच्या उमेदवारांकडून माघार

0

ठाणे  : ठाण्यात महायुतीची घोषणा झाल्यानंतर खरी लढत ही शिंदेची शिवसेना आणि ठाकरे बंधूच्या उबाठा आणि मनसे होणार अशी अपेक्षा व्यक्त होत असताना शुक्रवारी शिंदेच्या सात उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. काही जागांवर उबाठाच्या तसेच अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या सात जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाण्यात महायुतीची घोषणा झाल्यानंतर खरी लढत ही शिंदेची शिवसेना आणि मनसेमध्ये होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र निवडणुकी पूर्वीच शिंदेच्या शिवसेने राजकीय खेळी करत आपले सात उमेदवार बिनविरोध निवडणून आणले आहेत. प्रभाग क्रमांक १८ ब मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार जयश्री फाटक बिनविरोध विजयी झाल्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार रविंद्र फाटक यांच्या जयश्री फाटक या पत्नी आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार स्नेहा नागरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने तसेच मनसेच्या उमेदवार प्राची घाडगे त्यांचा अर्ज बाद झाल्याने जयश्री फाटक या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक १८ क मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार सुखदा मोरे बिनविरोध विजयी झाल्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या त्या पत्नी आहेत. काँग्रेसच्या उमेदवार वैशाली पवार यांनी आपला उमेवारी अर्ज मागे घेतल्याने तसेच मनसेच्या उमेदवार प्राची घाडगे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्याने सुखदा मोरे बिनविरोध विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक १७ अ मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार एकता भोईर बिनविरोध विजयी झाल्या असून एकता भोईर यांच्या समोर कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरला नाही. तसेच अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने त्यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे.

प्रभाग क्रमांक १८ ड मधून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार राम रेपाळे बिनविरोध विजयी झाले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विक्रांत घाग यांनी माघार घेतल्याने तसेच काँग्रेससह सर्व अपक्षांनी माघार घेतल्याने राम रेपाळे विजयी या प्रभागातून विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक १४ अ मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार शीतल ढमाले बिनविरोध विजयी झाल्या असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अरुणा पाटील आणि इतर अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने शीतल ढमाले बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

प्रभाग क्रमांक ५ अ मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार सुलेखा सुधाकर चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी स्थायी सभापती दिवंगत सुधाकर चव्हाण यांच्या त्या पत्नी आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार दिप्ती जाबर यांचा अर्ज बाद झाल्याने आणि अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने सुलेखा चव्हाण या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक ५ ब मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार जयश्री डेव्हिड बिनविरोध विजयी झाल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार दादा भाऊ रेपाळे यांनी माघार घेतल्याने जयश्री डेव्हीड बिनविरोध विजयी झाल्या आहेत. निवडणुकीच्या पूर्वीच एवढ्या मोठ्या प्रमाणात शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने ही मोठी राजकीय खेळी असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech