कोल्हापूर : यंदाचा प्रतिष्ठेचा शाहू पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट नाट्य दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराची घोषणा ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली आहे. हा पुरस्कार राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने दिला जात असून शाहू जयंतीदिनी (दि. २६) शाहू स्मारक भवन येथे मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, डॉ. जब्बार पटेल यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला संवेदनशील आणि विचारप्रवृत्त करणारे चित्रपट दिले. त्यांचे नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शन, सामाजिक मुद्द्यांवरील आशय आणि प्रयोगशीलता यामुळे त्यांना भारतीय चित्रपट आणि नाट्यसृष्टीत आदरणीय स्थान प्राप्त झाले आहे. त्यांचे कार्य मराठी संस्कृती आणि कलेला समृद्ध करणारे आहे आणि ते आजही नव्या पिढीला प्रेरणा देतात.
डॉ. जब्बार रझाक पटेल हे एक बहुआयामी दिग्दर्शक, नाटककार आणि बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यांचा जन्म २३ जून १९४२ रोजी पंढरपूर, महाराष्ट्र येथे झाला. बी.जे. मेडिकल कॉलेज पुणे येथून बालरोगतज्ज्ञ म्हणून शिक्षण घेतल्यावरही त्यांनी कला क्षेत्रात वाटचाल केली. वयाच्या दहाव्या वर्षीच जब्बार पटेल यांना शालेय नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शनाची संधी मिळाली, ज्यामुळे त्यांच्यात नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी आकर्षण निर्माण झाले. सोलापूर येथील श्रीराम पुजारी यांच्यासारख्या नाट्यक्षेत्रातील दिग्गजांकडून त्यांना प्रेरणा मिळाली.
जब्बार पटेल यांनी वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतले आणि ते बालरोगतज्ज्ञ (पेडियाट्रिशियन) बनले. त्यांनी पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले, जिथे त्यांचे सहाध्यायी अनिल अवचट आणि कुमार सप्तर्षी यांसारखे साहित्यिक आणि पत्रकारही होते. मात्र, वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी असूनही, त्यांची खरी आवड नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शनात होती. त्यांनी स्टेथोस्कोप खाली ठेवून कॅमेरा हाती घेतला आणि चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली.
जब्बार पटेल यांनी १९७० च्या दशकात नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनमध्ये हौशी नाट्यकलावंत म्हणून काम सुरू केले. त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शनं केले.त्यांनी थिएटर ॲकॅडमी या प्रायोगिक नाटकांसाठीच्या संस्थेची स्थापना केली, ज्यामुळे मराठी रंगभूमीला नवीन दिशा मिळाली.जब्बार पटेल यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या संवेदनशील आणि सामाजिक मुद्द्यांवर आधारित चित्रपटांद्वारे अमिट छाप सोडली. जब्बार पटेल यांना त्यांच्या योगदानासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.