मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. पवार बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी होते. त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांचा घसा दुखतो आहे तसंच कफाचाही त्रास सोबतच श्वास घ्यायला काही प्रमाणात त्रास होतं असल्याने त्यांना तातडीने पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शरद पवारांचे पुतणे श्रीनिवाज पवार यांनी सांगितलं की, शरद पवार यांना होणारा कफाचा त्रास रविवारी रात्रीपासून वाढला आहे, त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत कन्या तथा खासदार सुप्रिया सुळे देखील होत्या. पवार यांच्या ताफ्यात एक रुग्णवाहिका देखील आहे.
शरद पवार यांना सकाळपासूनच खोकला, ताप, सर्दीचा त्रास जाणवत असल्याने सकाळीच डॉक्टरांची एक टीम शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी दाखल झाली होती. डॉक्टरांनी शरद पवार यांची नियमित तपासणी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा दुपारी डॉक्टरंची एक टीम शरद पवार यांची तपासणी करण्यासाठी गेले होते. शरद पवार रुग्णालयात दाखल होणार असल्याचे समजताच रुबी हॉल क्लिनिक परिसरात कार्यकर्ते दाखल होण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. पवारांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती डॉक्टरांच्या तपासणीनंतरच समोर येईल.