शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिनेश शिंदे यांची शिवसेनेच्या राष्ट्रीय सह-समन्वयकपदी नियुक्ती

0

मुंबई : *शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे* यांनी पक्ष राष्ट्रीय स्तरावर पक्ष संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत *दिनेश शिंदे यांची शिवसेनेच्या राष्ट्रीय सह-समन्वयकपदी* नियुक्ती केली आहे. पक्षविस्तार आणि राष्ट्रीय स्तरावर समन्वय साधण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पक्षवर्तुळातून मिळाली आहे.

दिनेश शिंदे हे सध्या शिवसेनेचे मीडिया समन्वयक म्हणून कार्यरत होते. त्यांनी युरोपमधील United Business Institute मधून इंटरनॅशनल एमबीए (ह्यूमन रिसोर्स) पदवी प्राप्त केली आहे. विद्यार्थी चळवळीपासून त्यांनी शिवसेनेत कार्य करण्यास सुरुवात केली. तसेच जपानची बहुराष्ट्रीय कंपनी Mitsubishi Corporation येथे सुमारे २४ वर्षे व्यवस्थापन पातळीवर काम करत त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात भक्कम अनुभव संपादन केला आहे.

उत्तम संवाद कौशल्य, संयमी व तर्कसंगत विचारसरणी, तसेच संघटन कौशल्य ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या विचारांचे ते कट्टर समर्थक असून हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य हिंदुत्ववादी भूमिकेचा तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या सहवासाचा तसेच सामाजिक कार्यपद्धतीचा त्यांच्यावर प्रभाव राहिल्याचे सांगितले जाते.

शिवसेना मुख्य नेते एवं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाडशी नेतृत्वशैलीने प्रभावित होऊन दिनेश शिंदे यांनी शिवसेनेतील राजकीय घडामोडीनंतर पूर्णवेळ पक्षकार्य स्वीकारले. एकनाथ शिॅदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळापासून त्यांनी पक्षाच्या मीडिया समन्वयकपदाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळत राज्यभरातील तसेच इतर राज्यांतून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधला. पक्ष कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यांना मार्गदर्शन करण्याचे कामही त्यांनी सातत्याने केले आहे.

भाषेवर प्रभुत्व आणि विविध स्तरांवरील संपर्क यामुळे ते पक्ष नेतृत्व आणि देशभरातील पदाधिकारी यांच्यातील प्रभावी दुवा ठरले. त्यांच्या प्रशासकीय अनुभव, वक्तशीरपणा, अभ्यासू वृत्ती आणि सर्व समाजघटकांशी संवाद साधण्याच्या क्षमतेची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर शिवसेनेच्या राष्ट्रीय सह-समन्वयकपदाची जबाबदारी सोपवली आहे.

या नियुक्तीमुळे शिवसेनेच्या राष्ट्रीय विस्ताराला चालना मिळेल, असा विश्वास पक्षातील वरिष्ठांकडून व्यक्त होत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech