पुणे महापालिका निवडणुकीत पैसे वाटपाचा आरोप; शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हेंनी निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले – “कठोर कारवाई करा, अन्यथा संघर्ष वाढेल”
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन निवडणूक प्रक्रियेतील गंभीर अनियमिततांवर ताशेरे ओढले. मागील निवडणुकीत पैसे वाटप झालेल्या भागांतील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असल्या तरी त्यांचे ‘उद्योग’ दुसऱ्या ठिकाणी सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
“गेल्या सहा महिन्यांत बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे रेकॉर्ड तपासावे. मतदान केंद्रांवर पूर्ण पारदर्शक प्रक्रिया राबवावी. पैसे वाटून निवडणूक जिंकता येत नाही; असते तर काँग्रेस कधीच हरली नसती,” असे गोऱ्हे म्हणाल्या. पैसे वाटपाबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलीस आणि प्रशासनावर दबावाचा आरोप
निवडणुकीदरम्यान मोक्याच्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असून, पोलिसांनी दबावाला बळी न पडता गस्त कठोर करावी, अन्यथा संघर्ष वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा डॉ. गोऱ्हे यांनी दिला. मतदारांना मतपत्रिका देताना प्रक्रिया स्पष्ट समजावून सांगावी, असे आवाहनही त्यांनी निवडणूक आयोगाला केले.
शिवसेनेची रणनीती विकासकेंद्रित
शिवसेनेने यंदा आरोप-प्रत्यारोप टाळून फक्त विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. पुण्याला समाजसुधारकांचा वारसा आहे; पुणेरी संस्कृती टिकवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत, असे गोऱ्हे म्हणाल्या. शहराची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार असून, मनपात यश मिळाल्यास पर्यटनाला चालना, शाळा-सुविधा, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि समाविष्ट गावांतील दुहेरी कराचा प्रश्न सोडवण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
लाडकी बहीण योजनेतून महिलांना दिलासा
लाडकी बहीण योजनेत डिसेंबरचे पैसे खात्यात येण्यास सुरूवात झाली असून, निवडणूक आयोगाची यात कोणतीही अडचण नाही. काँग्रेस या योजनेला विरोध करत आहे; महिलांनी आपले खरे विरोधक ओळखावेत. लाडकी बहीण योजनेचा सव्वादोन कोटी महिलांना लाभ मिळत आहे. शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे गोऱ्हे यांनी सांगितले.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न
निवडणुकीदरम्यान दबाव राजकारण आणि पैसे वाटपाचे प्रकार घडत असून, राजकीय पक्षांनी कायदा-सुव्यवस्थेवर आग्रही भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निवडणूक स्वच्छतेसह पुणे शहराच्या भविष्यकालीन विकासावर आणि महिलांच्या विकासावर विशेष जोर दिला. पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेची ही भूमिका निर्णायक ठरणार आहे.