बंगळुरु : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि इतर तीन जणांना घेऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारी बहुप्रतिक्षित अॅक्सिओम-४ व्यावसायिक मोहीम आता १९ जून रोजी प्रक्षेपित होणार असल्याची घोषणा इस्रोने केली आहे. अॅक्सिओम-४ म्हणजेच अॅक्स-०४ मोहिमेतून अवकाशातील त्यांच्या पहिल्या प्रवासाची तयारी करत शुभांशू शुक्ला इतिहास रचण्यास आता सज्ज आहेत. हे अभियान फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून स्पेसएक्सच्या विश्वसनीय फाल्कन ९ रॉकेटवरून उड्डाण करेल.
गेल्या आठवड्यात, फाल्कन ९ रॉकेटमध्ये द्रव ऑक्सिजन गळती झाल्यानतर १० जून २०२५ रोजी होणारे अॅक्सिओम-४ मोहिमेचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले होते. रॉकेटच्या बूस्टरमध्ये ही गळती आढळली होती. अॅक्सिओम अंतराळ मोहीम ११ जून रोजी फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित होणार होती. परंतु प्रथम स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटमध्ये इंधन गळती आणि नंतर आयएसएसच्या रशियन विभागात गळतीमुळे ती पुढे ढकलण्यात आली. सुरुवातीला २९ मे रोजी प्रक्षेपित होणारी १४ दिवसांची मोहीम देखील ८ आणि १० जून रोजी पुढे ढकलण्यात आली होती.