अपघातात वायुसेनेचे २ वैमानिक हुतात्मा
गुवाहटी : असम राज्यातील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात गुरुवारी रात्री भारतीय वायुसेनेचे सुखोई एसयू- ३० – एमकेआय हे लढाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. यात वायुसेनेच्या २ वैमानिकांनी हौतात्म्य पत्करले आहे. फ्लाईट लेफ्टनंट अनुप आणि पूर्वेश दुरुगकर अशी त्यांची नावे आहेत. भारतीय वायुसेनेने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे या अपघाताची अधिकृत माहिती दिली आहे. वायुसेनेने सांगितले की, हे एसयू-३०-एमकेआय लढाऊ विमान प्रशिक्षण मोहिमेवर होते. असममधील जोरहाट येथून उड्डाण केल्यानंतर सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्बी आंगलोंग परिसरात हे विमान कोसळले. भारतीय वायुसेनेने गुरुवारी, ५ मार्च रोजी रात्री ९ ३४ मिनिटांनी विमान बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. या लढाऊ विमानाने जोरहाट येथून उड्डाण केले होते आणि संध्याकाळी ७ वाजून ४२ मिनिटांपर्यंत त्याचा शेवटचा संपर्क झाला होता.
सुखोई एसय-३०-एमकेआय हे दोन आसनी (टू-सीटर) लढाऊ विमान असून ते रशियातील विमान निर्माता कंपनी सुखोईने तयार केले आहे. विमानाशी संपर्क तुटल्यानंतर भारतीय वायुसेनेने तात्काळ शोध मोहीम सुरू केली होती.नंतर उशिरा रात्री शोध मोहिमेदरम्यान विमान सापडले, मात्र ते अपघातग्रस्त अवस्थेत आढळले. तसेच या दुर्घटनेत अनुप आणि पूर्वेश हे २ वैमानिक हुतात्मा झालेत. हे लढाऊ विमान असममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात कोसळले आहे. या घटनेबाबत पुढील तपास सुरू करण्यात आल्याचे वायुसेनेने सांगितले.