मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात आणि मंत्रिमंडळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाची धुरा तसेच मंत्रिमंडळासह संतुलन साधण्यासाठी पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी आज लोकभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या निमित्ताने राज्याला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत.
कुटुंबावर ओढावलेले संकट बाजूला सारून पक्षाच्या भविष्याकरिता धीरोदात्तपणे सुनेत्रा पवार यांनी पुढे येऊन राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दालनात आमदारांची बैठक झाली. त्यात सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर शनिवारी सायंकाळी पाच वाजता लोकभवनात त्यांचा शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला. राज्याच्या इतिहासात पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद झाली आहे. अजित पवार यांना स्मरूण त्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यावेळी एकद वादा अजितदादा… अजितदादा अमर रहे अशा घोषणांनी लोकभवनातील मध्यवर्ती सभागृह दुमदुमून गेले होते.तत्पूर्वी सरकारी बंगला ‘देवगिरी’वर सुनेत्रा पवार यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या फोटोला नमस्कार करून लोकभवनाकडे रवाना झाल्या. शपथ घेण्याआधी त्यांनी अजित पवार यांना नमन करून त्यांचे एकप्रकारे स्मरण केले. उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारण्याआधी त्यांनी अजित पवार यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या नव्या कारकीर्दीला सुरुवात केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेता निवडीसाठी आज विधानभवनात राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा अजितदादा पवार यांची विधीमंडळ पक्षनेता म्हणून एकमताने निवड करण्यात आली, तर विधीमंडळ पक्षनेता म्हणून व्हिप काढण्याचे तसेच विधीमंडळ कामकाज पार पाडण्यासाठी असलेले इतर सर्व संविधानिक अधिकार देण्यात येत असल्याचे दोन ठराव ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी मांडले. या दोन्ही ठरावाला मंत्री हसन मुश्रीफ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री नरहरी झिरवाळ, माजी मंत्री संजय बनसोडे यांनी अनुमोदन दिले. विधीमंडळ पक्षनेता निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,माजी मंत्री धनंजय मुंडे,माजी मंत्री संजय बनसोडे, माजी खासदार समीर भुजबळ यांनी भेट घेतली.
पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडीयावर सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी म्हणाले की, सुनेत्रा पवार महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. तसेच त्या राज्यातील जनतेच्या भल्यासाठी सातत्याने प्रयत्न करतील आणि स्वर्गीय अजित पवार यांच्या दृष्टिकोनाची पूर्तता करतील असा विश्वास देखील पंतप्रधानांनी व्यक्त केलाय.