पार्थ पवार जाणार राज्यसभेवर
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या मुंबईत आयोजित बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी याची घोषणा केली. पटेल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत याबाबतचा प्रस्ताव मांडला, त्याच सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली. या बैठकीसाठी सुनील तटकरे, पार्थ पवार, रुपाली चाकणकर, छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. राज्यसभेसाठी पार्थ अजितदादा पवार हे आमचे उमेदवार असतील. विजयासाठी ३७ मतांची गरज आहे, पण आमच्याकडे ४० मतं आहेत. आम्ही चाळीसच्या चाळीस आमदार एकमताने, एक दिलाने पार्थ पवार यांना निवडून देऊ, अशी घोषणा देखील पटेल यांनी यावेळी केली.
प्रफुल पटेल यावेळी म्हणाले की, अजित पवार यांच्या जाण्याने नुकसान झालं. त्यांच्यामुळे राज्यात आणि देशात आपली ओळख निर्माण झाली होती. २०२३ मध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले, हे सांगण्यात मला कोणतीही अडचण नाही. अजित दादा 28 जानेवारी दिवशी आपल्यातून निघून गेले, आपल्या सर्वांसाठी ते धक्कादायक होतं. आपल्या सर्वाना प्रश्न होता उद्या आपण काय करणार, कसं करणार? पण सुनेत्राताईंच्या नेतृत्वात आपला पक्ष काम करेल, असेही ते म्हणाले.
अजित पवारांनी मला राष्ट्रीय कार्याध्यक्ष केलं होतं. त्यांनी माझ्यावर एवढा मोठा विश्वास टाकला होता. पक्ष महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी आम्ही काम केलं. राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून तटकरे आणि भुजबळ, मुश्रीफ आमची सर्वांची जबाबदारी होती आपला पक्ष आपण कशा प्रकारे पुढे घेऊन जाणार आहोत. मी ३५ वर्ष अजित पवारांचा मित्र म्हणून आज घोषणा करत आहे. अजित पवार एका वेगळ्या मातीचेच बनले होते, आपल्यावर अनेक संकटे आली. अजित पवारांनी नेतृत्व हातात घेतल्यानंतर एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली आपल्याला प्रश्न पडला होता आता आपण पुढे कसं जाणार आहोत. मात्र, अजित पवारांनी कधीही आपला निश्चय कमी होऊ दिला नाही. शेवटी नेता तोच असतो जो लढाईमध्ये पुढे येऊन लढाई लढतो आणि त्यानुसार त्यांनी लढाई लढली, जिंकली. सुनेत्रा पवार, सुनील तटकरे यांना माहिती आहे की, अजित पवारांबाबत काय भावना होती आणि आता नाहीत त्यावेळी काय आहे. सुनेत्रा पवार ज्यावेळी उपमुख्यमंत्री झाल्या त्यावेळी आम्ही संसदेत गेलो त्यावेळी सगळेजण येऊन भेटत होते, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, अशी आठवण पटेल यांनी सांगितली.