उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आज, शनिवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी एकमताने विधिमंडळ नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड केली आहे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी त्यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला. विधानभवनात आज, दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी शोक प्रस्ताव मांडत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. उपस्थित आमदारांनी एकमताने पाठिंबा देत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली. सुनेत्रा पवार यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती. मात्र आता राज्याच्या सत्तेत महत्त्वाची जबाबदारी स्वीकारत असल्याने त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.