सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी

0

राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणार

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाईल, याची चर्चा जोर धरली होती. त्याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज, शनिवारी सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्याच्या बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर त्यांच्या जागी कुणाची निवड होणार यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. यापार्श्वभूमीवर शनिवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते दिवंगत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. यानिवडीवरून हे स्पष्ट झाले की, राष्ट्रवादीतर्फे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री बनणार आहेत. सुनेत्रा पवार लवकरच राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील आणि बारामती मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवतील अशी माहिती पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिली. दरम्यान अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार हे शरद पवार यांच्याशी भेटीसाठी दाखल झाले असून, या भेटीत होणाऱ्या चर्चेवर राज्याचे लक्ष लागले आहे.

सुनेत्रा पवारांचा सामाजिक व राजकीय प्रवास :- ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाजीराव पाटील यांची कन्या असलेल्या सुनेत्रा पवारांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी धाराशिव जिल्ह्यात झाला. त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील एस. बी. महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. शरद पवार यांचे पाटील कुटुंबियांशी जवळचे संबंध होते. यातूनच दोन्ही कुटुंबात सोयरीक होऊन १९८० मध्ये सुनेत्रा आणि अजित पवारांचा विवाह झाला. लग्नानंतर सुरुवातीला त्यांनी अजित पवारांच्या दुधाच्या व्यवसायात मदत केली. नंतर समाजसेवेच्या क्षेत्रात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. महाबळेश्वरला फिरताना प्रेरणा घेऊन त्यांनी काटेवाडी प्रकल्पाची सुरुवात केली, जेथे ८० टक्के लोकांकडे शौचालय नव्हते. या मोहिमेतून निर्मलग्राम आणि ग्रामस्वच्छता अभियानाला पुढाकार मिळाला. सुनेत्रा पवार यांनी राज्यातील ८६ गावांमध्ये निर्मलग्राम मोहिमेचे नेतृत्व केले. बारामती परिसर टँकरमुक्त करण्यासाठी ‘प्रोजेक्ट मेघदूत’ राबवला, तसेच टेक्सटाईल पार्क सुरू करून सुमारे १५ हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. तसेच २००६ पासून टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी कार्य केले.

शैक्षणिक क्षेत्रातही सुनेत्रा पवार सक्रिय आहेत. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे विश्वस्त म्हणून कार्यरत असून, येथे सुमारे २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी २०१० मध्ये त्यांनी एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया ची स्थापना केली.सुनेत्रा पवार यांना जलसंधारण, जैवविविधता संवर्धन, दुष्काळ निवारण आणि समाजसुधारणा क्षेत्रातील कार्यासाठी “ग्रीन वॉरियर अवॉर्ड” मिळाला आहे. जागतिक उद्योजकता मंच (फ्रान्स) च्या २०११ पासून त्या थिंक टँक सदस्य आहेत. भारताच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांना संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार व सायबर ग्राम पुरस्कार प्रदान केले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech