मुंबई : उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून विलिनीकरणाबाबत वेगवेगळे दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. आमदार रोहित पवार यांनी लवकरच पत्रकार परिषद घेऊन विलिनीकरणाबाबत काय बोलणी झाली, तसेच इतर माहिती देणार आहेत. या दरम्यान आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनीही महत्त्वाचे विधान केले आहे. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, हसन मुश्रीफ जरूर पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. आम्ही सर्वांनी दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेवटी या विषयाची चर्चा आम्ही सखोलपणाने करू. १० तारखेला मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी (सुनेत्रा पवार) तेथे येतील, तेव्हा या विषयावर नक्कीच चर्चा करू. कदाचित मग त्या दिल्लीतही येऊ शकतील. राष्ट्रपती महोदयांची भेट, पंतप्रधानांची भेट, राज्यसभेच्या त्या सदस्या आहेत, त्या संदर्भातील ज्या संवैधानिक जबाबदार्या आहेत… आम्ही योग्य वेळेला बसून त्याबद्दल निर्णय करू.
विलिनीकरणाबाबतचा सुनेत्रा पवार निर्णय घेतील का? त्यांच्याकडे ही सर्व निर्णय प्रक्रिया असणार आहे का? की तुमच्या पक्षाच्या कोअर कमिटीमध्ये विलिनीकरणाबाबत पुन्हा चर्चा होईल? असा प्रश्न सुनील तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. याबद्दल तटकरे म्हणाले की, आम्ही २०२३ ला निर्णय घेतला तो आम्ही एकत्र बसून घेतला. वहिनी आमच्या विधिमंडळ पक्षासह संपूर्ण पक्षाच्या नेत्या आहेत. त्यामुळे त्या संदर्भात एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दादांचा राजकीय परिवार आहे. जो नेटाने, आत्मविश्वासाने, कणखरपणाने… राजकीय इच्छाशक्ती ही दादांनी लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर ज्या पद्धतीने दाखवली दाखवली आणि राज्यातील १३ कोटी जनतेने आम्हाला ७३ टक्के स्ट्राईक रेट देत आम्हाला विजयी केलं. त्यामुळे स्वभाविकपणे आम्ही या संदर्भातील निर्णय योग्यपणाने घेऊ.
सुनेत्रा पवारांना अर्थखातं का मिळालं नाही? याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. संजय राऊतांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आज सुनील तटकरे यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना ते म्हणाले की, याबाबत बोलण्याचा संजय राऊत यांना काय अधिकार आहे? आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत. त्या संदर्भातील निर्णय आम्ही करू. उद्या शिवेसना ठाकरे गट या पक्षात कोणाला काय करायचं? याचा सल्ला देण्याचा आमचा अधिकार नाही आणि आम्ही कधी त्या विषयांवर बोलत नाही. संजय राऊतांनी त्यांची प्रकृती लक्षात घेता दुसऱ्यांच्या पक्षात डोकावण्याचं काहीही कारण नाही.