भूषण गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करा – नाना पटोले

0

मुंबई : सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबई दौ-यावर असताना राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणेकडून राजशिष्टाचाराचा भंग करून त्यांचा अवमान करणा-या अधिका-यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून केली आहे. या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, सरन्यायाधीश हे संविधानिक संस्थेचे प्रमुख आहेत, त्यांचा अवमान हा संपूर्ण न्यायव्यवस्थेचा अवमान आहे. हा केवळ एका व्यक्तीच्या दुर्लक्षित वागणुकीपुरता मर्यादित नाही, तर भारतीय संविधानाच्या प्रतिष्ठेवर झालेला थेट आघात म्हणून याकडे पाहावे लागेल. ते आंबेडकरी विचारसरणीचे असल्याने त्यांना अशी वागणूक दिली का ? विशेष म्हणजे ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून त्यांना मिळालेली उपेक्षात्मक वागणूक ही सामाजिकदृष्ट्या संवेदनशील बाब आहे.

सरन्यायाधीशांनी स्वतः आपल्या भाषणात राज्य सरकार व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांच्या विधानामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकाराकडे वळले असून, हा फक्त प्रोटोकॉलचा भंग नव्हे, तर एका विचारधारेचा व संवैधानिक मूल्यांचा अवमान आहे का, हा प्रश्न देखील उपस्थित होतो. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी महामहीम राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्राद्वारे संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही आणि संविधानिक संस्थांचा सन्मान अबाधित राहील.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech