अहील्यानगर : जिल्ह्याचे भूमीपुत्र आणि तमाशा कलावंत रघूवीर खेडकर यांचा यंदाच्या पद्म पुरस्काराने झालेला सन्मान महाराष्ट्राच्या ग्रामीण कलेचा गौरव असून, तमाशा कलेचा नावलौकीक झाला असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. रघूवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. खेडकर परीवाराचे मोठे योगदान तमाशा कलेसाठी आहे. जेष्ठ तमाशा कलावंत स्व.कांताबाई सातारकर यांच्या कडून मिळालेला कलेचा समृध्द वारसा रघूवीर खेडकर यांनी यशस्वीपणे पुढे नेला. आव्हानात्मक परीस्थितीत तमाशा कलेला जिवंत ठेवण्यासाठी समर्पित भावनेने दिलेल्या योगदानाचा गौरव केंद्र सरकारने पद्म पुरस्कार देवून केल्याचा अभिमान असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
ग्रामीण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून तमाशा कलेकडे पाहीले जाते.अनेक जेष्ठ श्रेष्ठ कलाकारांनी आपल्या त्यागाने महाराष्ट्राच्या कला परंपरेची जोपासना करण्यार्या प्रत्येक कलावंताचा बहुमान या पुरस्काराने झाला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलरा विखे पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा पहीला राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार प्रवरा परीवाराने स्व.कांताबाई सातारकर यांना देवून सन्मानित केल्याची आवर्जून आठवण विखे पाटील यांनी सांगितली.