‘टेक वारी’तील ज्ञानाचा नमुंमपा अधिकारी, कर्मचारी घेत आहेत ऑनलाईन लाभ

0

नवी मुंबई : महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” हा अभिनव उपक्रम दि. ५ ते ९ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून शासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी स्वयंविकास घडवित विविध नागरी सेवा अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्याच्या दृष्टीने माहितीपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ विविध क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत करून देण्यात येत आहे.

सद्यस्थितीत तंत्रज्ञानात आणि भवतालच्या परिस्थितीत झपाटयाने बदल होत असल्याने प्रशासकीय अधिकारी – कर्मचारी यांना अद्ययावत बनविण्यासाठी प्रशिक्षण दिले जावे व यामधून प्रशासकीय कामकाजात अचूकता व गतीमानता आणली जावी तसेच काम करत असताना येणा-या ताणतणावाचे व्यवस्थापन करण्याबाबत मार्गदर्शन मिळावे या दृष्टीने हा अभिनव उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे.

या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी / कर्मचारीवृंदानेही ‘टेक वारी’ या आधुनिक तंत्रज्ञान व नवीन कल्पनांचा संगम असलेल्या कार्यशाळेचा लाभ घ्यावा यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात टेक वारीच्या ऑनलाईन व्याख्यान सत्राची थेट प्रक्षेपण व्यवस्था करण्यात आलेली आहे. याकरिता महापालिका प्रशासन विभागाने पाच दिवसात दिवसभर संपन्न होणा-या उपक्रमातील व्याख्याने महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी अनुभवण्याचे नियोजन केले असून प्रत्येक विभागाला व्याख्याने बघण्याच्या वेळा निश्चित करून दिलेल्या आहेत.त्यानुसार दररोज संबधित विभागातील अधिकारी, कर्मचारी या विविध उपयोगी विषयांवरील व्याख्यानांतील ज्ञानसंपदेचा लाभ घेत आहेत.

आधुनिक तंत्रज्ञान हे सर्व शासकीय कर्मचा-यांसाठी सहज-सोपे आणि समजण्याजोगे बनविणे, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज, सायबर सुरक्षा, डिजिटल फायनान्स अशा महत्वाच्या क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे हे जटिल विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगणे हा ‘टेक’वारीचा गाभा असून प्रशासकीय सक्षमीकरण, सेवा प्रदानात सुलभता व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याविषयी कार्यशाळेमध्ये त्या त्या क्षेत्रातील नामवंत व्याख्याते मार्गदर्शन करीत आहेत. ‘टेक वारी’ मधील या मार्गदर्शनाचा लाभ नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनीही घ्यावा व याचा उपयोग आपल्या कामकाजात करावा यादृष्टीने टेक वारी ऑनलाईन अनुभवण्याचा हा उपक्रम राबविला जात असून त्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech